US-Canada Relations: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कॅनडासोबतच्या व्यापार चर्चा संपुष्टात आणल्यानंतर, ट्रम्प यांनी सांगितले की ते आशिया दौऱ्यात कार्नी यांची भेट घेणार नाहीत. पत्रकारांनी त्यांना व्हाईट हाऊसच्या बाहेर विचारले की, आपण कॅनडाच्या पंतप्रधानांशी बोलणार आहात का? त्यावर ट्रम्प यांनी थेट उत्तर दिलं, 'नाही, माझा असा कोणताही विचार नाही. त्यांनी जे केलं ते बेईमान आहे. त्यांनी घाणेरडा खेळ खेळला, पण मी त्यांच्यापेक्षाही घाणेरडा खेळ करू शकतो.'
वादग्रस्त जाहिरातीवरून वाद चिघळला
ट्रम्प यांची ही नाराजी एका कॅनेडियन जाहिरातीवरून व्यक्त झाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कॅनडाने माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या टॅरिफ विरोधी भाषणाचा गैरवापर करत बनावट जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीमुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर आणि व्यापार निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला, असा ट्रम्प यांचा आरोप आहे.
हेही वाचा – Liechtenstein Country: 'या' देशात स्वतःचे विमानतळ नाही तरीही जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक
ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले की, 'रोनाल्ड रेगन फाउंडेशनने उघड केले की, कॅनडाने 75,000 डॉलर्सची जाहिरात बनवून रेगनचा गैरवापर केला. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी शुल्क आवश्यक आहे. त्यामुळे सर्व व्यापार चर्चा त्वरित थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.'
हेही वाचा – Nepal Accident: नेपाळमध्ये जीप 700 फूट खोल दरीत कोसळली, अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
कॅनडाची प्रतिक्रिया
या वादानंतर ओंटारियोचे प्रीमियर डग फोर्ड यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्नी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर यूएसमध्ये सुरू असलेली जाहिरात मोहीम सोमवारपासून स्थगित केली जाईल. मात्र आठवड्याच्या शेवटी वर्ल्ड सिरीज बेसबॉल सामन्यांदरम्यान जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. या जाहिरातींसाठी अंदाजे ७५ दशलक्ष डॉलर खर्च होत असल्याचे समजते.
ट्रम्प यांचे शुल्क धोरण
ट्रम्प यांनी कॅनेडियन वस्तूंवर 35 टक्के शुल्क, धातू क्षेत्रावर 50 टक्क्यांपर्यंत, तर वाहनांवर 25 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले आहे. कॅनडानेही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन उत्पादनांवर कठोर शुल्क लागू केले आहे. मात्र ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात स्वाक्षरी झालेल्या यूएसए-मेक्सिको-कॅनडा करारातील उत्पादनांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.