Travel Advisory: भारतीय प्रवाशांवरील गैरवर्तनाच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला कडक संदेश दिला आहे. शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेची झालेली छेडछाड उघडकीस आल्यानंतर भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, चीनने तातडीने उपाययोजना करून भारतीय प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
चीनला दिला ठाम संदेश
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी वक्तव्य करताना सांगितले की, आम्हाला अपेक्षा आहे की चिनी अधिकारी खात्री देतील की भारतीय प्रवाशांना निवडकपणे लक्ष्य केले जाणार नाही. त्यांना मनमानीपणे ताब्यात घेतले जाणार नाही किंवा त्रास दिला जाणार नाही. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास नियमांचे पालन चीनने करणे अत्यावश्यक आहे. तथापी, यावेळी त्यांनी भारतीय प्रवाशांची मनमानी तपासणी, प्रश्नोत्तर आणि गैरवर्तनाच्या तक्रारी वाढत असल्याचे नमूद केले.
प्रवास सल्लागार जारी
या घडामोडींनंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास सल्लागार जारी केला आहे. यात चीनमध्ये किंवा चीनमार्गे प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जयस्वाल म्हणाले, भारतीय नागरिकांनी चीनला प्रवास करताना किंवा चीनमार्गे अन्य देशात जाताना विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत तत्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.
#WATCH | Delhi: MEA spokesperson Randhir Jaiswal says, "We expect the Chinese authorities to provide assurances that Indian citizens transiting through Chinese airports will not be selectively targeted, arbitrarily detained or harassed and that regulations governing international… pic.twitter.com/XMYfB53RJm — ANI (@ANI) December 8, 2025
हेही वाचा – India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार कधी अंतिम होणार? ट्रम्प टॅरिफबाबत मोठी अपडेट
अरुणाचलमधील महिलेला ताब्यात घेतल्यावर भारताचा निषेध
गेल्या महिन्यात शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील भारतीय पासपोर्ट धारक प्रेमा वांगजोम थोंगडोक यांना चीनने मनमानीपणे ताब्यात घेतल्यानंतर भारताने तीव्र निषेध केला होता. चीनच्या नियमांनुसार व्हिसा-मुक्त ट्रान्झिटसाठी त्या पात्र असूनही त्यांना अडवण्यात आले होते. भारताने स्पष्ट केले होते की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे. कोणत्याही राजकीय आक्षेपामुळे ही सत्यस्थिती बदलणार नाही. या प्रकरणावर भारताने बीजिंग आणि नवी दिल्लीतील चिनी दूतावासांना कडक निषेध पत्र देखील दिले आहे.