Mathura Boat Accident : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एका अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वृंदावन येथील यमुना नदीत भाविकांनी भरलेला एक बोट उलटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना वृंदावनमधील 'शृंगार घाट' जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीवर सुमारे 30 लोक स्वार होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
आतापर्यंत 6 मृत्यूंची माहिती
'कोतवाली वृंदावन' पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ही दुर्घटना घडली. भाविकांनी खचाखच भरलेल्या या बोटीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती नदीत उलटली. प्रशासनाने आतापर्यंत 6 जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तर 15 जणांना स्थानिक नागरिक आणि पाणबुड्यांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि पाणबुड्यांचे पथक सतत शोधमोहीम राबवत आहे.
लुधियानाचे भाविक दर्शनासाठी आले होते
प्राप्त माहितीनुसार, या स्टीमरमधील सर्व भाविक पंजाबमधील लुधियाना येथून मथुरा आणि वृंदावनच्या दर्शनासाठी आले होते. यमुना नदीतून प्रवास करत असताना स्टीमरची एका 'पॉन्टून पुलाला' (तरंगत्या पुलाला) जोरदार धडक बसली. या धडकेमुळे बोटीचा तोल गेला आणि ती क्षणात उलटली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा अपघात इतका अचानक घडला की प्रवाशांना स्वतःला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण प्रसंगामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जखमींवर उपचार आणि प्रशासकीय मदत
घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नदीतून बाहेर काढलेल्या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शोधमोहिमेसाठी प्रशासनाने स्थानिक पाणबुड्यांची मोठी मदत घेतली आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि बेपत्ता लोकांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे.