Three Sisters Marry One Man: उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 3 बहिणींनी त्यांच्याच कॅमेरामनशी विवाह केल्याची अजब घटना समोर आली आहे. सरोज, सावित्री आणि संतोष अशी या तिन्ही बहिणींची नावे असून त्यांनी विकास (उर्फ विकू) नावाच्या तरुणाशी एका मंदिरात विवाह केला. 17 जुलै रोजी अमरोहामधील हसनपूर येथील ‘माँ चामुंडा’ मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर स्थानिक हिंदू संघटनांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी या तिन्ही नववधू पतीसह स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.
या तिन्ही बहिणींचे वय 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान असून त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हा विवाह केल्याचे पोलिसांना सांगितले. विवाहाचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, लहानपणापासून त्या नेहमी एकत्र राहिल्या आहेत, 24 तास एकमेकींच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांना वेगळे व्हायचे नव्हते. एकाच घरात 3 मुले असलेल्या कुटुंबाचा शोध त्यांनी घेतला, परंतु असा कोणताही वर किंवा कुटुंब न मिळाल्याने त्यांनी अखेर एकाच पुरुषाशी विवाह करण्याचा मार्ग निवडला. विवाहाच्या अधिकृत नोंदणीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की नोंदणी करूनही अनेक विवाह टिकत नाहीत, त्यामुळे सध्या त्या जशा आहेत तशा आनंदी असून गरज भासल्यासच नोंदणीचा विचार करतील.
अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा
हिंदू संघटनांकडून होत असलेल्या टिकेला उत्तर देताना या तिन्ही बहिणींनी एक व्हिडिओ जारी करून आपल्या निर्णयाचे समर्थन केले. सनातन धर्माचा अपमान केल्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी प्राचीन काळात राजा दशरथालाही 3 राण्या असल्याचा दाखला दिला. पती विकासनेही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या तिन्ही बहिणींचे एकमेकींवर इतके प्रेम आहे की त्यांना वेगळ्या प्रेमाची गरजच भासत नाही. या संपूर्ण प्रकारामुळे सध्या परिसरात आणि सोशल मीडियावर या अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे.