Raghav Chadha vs AAP: ‘हा तर फक्त ट्रेलर, पूर्ण पिक्चर अजून बाकी…’; राघव चढ्ढा यांचा ‘आप’ला पुन्हा इशारा

चढ्ढा यांनी आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवर एक आक्रमक व्हिडिओ पोस्ट करत पक्षातील आपल्याच सहकाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे.

Raghav Chadha vs AAP: ‘हा तर फक्त ट्रेलर, पूर्ण पिक्चर अजून बाकी…’; राघव चढ्ढा यांचा ‘आप’ला पुन्हा इशारा

Raghav Chadha vs AAP: आम आदमी पक्षाचे (AAP) नेते राघव चढ्ढा आणि पक्षीय नेतृत्व यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. चढ्ढा यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर एक आक्रमक व्हिडिओ पोस्ट करत पक्षातील आपल्याच सहकाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. “हा तर केवळ एक छोटासा ट्रेलर आहे, पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला असून, या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पंजाबच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत आरोपांची राळ
राघव चढ्ढा यांच्यावर पंजाबमधील ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा, प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा आणि प्रवक्ते कुलदीप सिंग धालीवाल यांनी दावा केला आहे की, राज्यसभा सदस्य असूनही चढ्ढा संसदेत पंजाबचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरले आहेत. राज्याच्या हितासाठी त्यांची निवड करण्यात आली होती, मात्र संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगले, असा ठपका या नेत्यांनी ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर चढ्ढा यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “माझ्यासाठी पंजाब हा केवळ चर्चेचा विषय नाही. ते माझे घर, माझे कर्तव्य आणि माझा आत्मा आहे.”

‘मी जखमी आहे, म्हणूनच अधिक घातक ठरेन’
आपल्या भूमिकेवर ठाम राहत राघव चढ्ढा यांनी अत्यंत कणखर बाणा दाखवला आहे. “माझ्या विरोधात एक सुनियोजित मोहीम आखली गेली आहे. मला गप्प केले गेले असेल, पण माझा पराभव झालेला नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. “मी सध्या जखमी आहे आणि म्हणूनच अधिक घातक ठरलो आहे. जर मी आता गप्प राहिलो असतो, तर वारंवार सांगितले जाणारे खोटे कालांतराने सत्य भासू लागले असते, म्हणूनच आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे,” असे सूचक विधान त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात केले आहे.

हेही वाचा – Raghav Chadha: ‘मी गप्प राहिलो असतो तर खोटं खरं वाटलं….’; राघव चढ्ढा यांचा ‘आप’मधील वादावर मोठा गौप्यस्फोट

पदावरून हटवल्यानंतर वाढला तणाव
या वादाची ठिणगी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील ‘आप’च्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर पडली. पक्षाने त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याची विनंती राज्यसभा सचिवालयाला केली होती. पक्षाच्या या निर्णयामुळे चढ्ढा नाराज असल्याचे बोलले जात असून, तेव्हापासून त्यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. आता या ‘ट्रेलर’नंतर आगामी काळात कोणता ‘चित्रपट’ समोर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number