Goa Night Club Fire: गोव्यातील अर्पोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबसध्ये लागलेल्या भीषण आगीने राज्याला हादरवून सोडले आहे. 6 डिसेंबरला झालेल्या या दुर्घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, पब, नाईटक्लब आणि रेस्टॉरंट्समध्ये फटाके, इलेक्ट्रॉनिक फटाके, फ्लेअर आणि आगीचे खेळ यांच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कडक निर्देश
दरम्यान, बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा. कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. अधिकाऱ्यांनुसार, सरकारने यापूर्वीच उच्चस्तरीय दंडाधिकारी चौकशी समिती, अग्निसुरक्षा ऑडिट समित्या स्थापन केल्या आहेत. ख्रिसमस आणि नववर्षासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक अपेक्षित असल्याने सुरक्षेचे नियम अधिक कडक केले गेले आहेत.
हेही वाचा – Kidney Stone Surgery: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली किडनी स्टोनची शस्त्रक्रिया; काही तासांतच गमावला जीव
अजय गुप्ता यांना ट्रान्झिट रिमांड
घटनेनंतर सह-मालक अजय गुप्ता यांच्यावर कारवाई सुरू असून, दिल्ली न्यायालयाने त्यांना 36 तासांचा ट्रान्झिट रिमांड गोवा पोलिसांना मंजूर केला आहे. तपासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
आगीच्या घटनेतून वाचलेली बेली डान्सर कायद्याच्या कचाट्यात
तथापी, नाईट क्लबमधून थोडक्यात बचावलेली बेली डान्सर आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. आगीच्या वेळी क्लबमध्ये परफॉर्म करणारी बेली डान्सर क्रिस्टिना (कझाकिस्तानची रहिवासी) थोडक्यात बचावली होती. मात्र, आता ती वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, क्रिस्टिना भारतात बिझनेस व्हिसाशिवाय काम करत होती. तिने व्हिसासाठी अर्ज केला असला तरी तो अद्याप मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत नाईटक्लबमध्ये प्रोफेशनल परफॉर्मन्स करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. दरम्यान, गोव्यातील दुर्घटनेनंतर राज्यात सुरक्षा नियमांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.