Border 2 Teaser Out: भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बॉर्डर 2’चा पहिला अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 16 डिसेंबर, विजय दिनाचे औचित्य साधत, निर्मात्यांनी हा दमदार टीझर रिलीज करत भारतीय लष्कराच्या शौर्याला आणि 1971 च्या ऐतिहासिक विजयाला भावपूर्ण सलाम केला आहे. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर देशभक्तीचा उत्साह उसळला आहे. सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा चित्रपट 2026 मधील पहिला मोठा वॉर ड्रामा मानला जात आहे. विशेष म्हणजे, सनी देओल पुन्हा एकदा युद्धभूमीवर परतताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सनी देओलचा बुलंद आवाज
टीझरची सुरुवात “1971 भारत-पाकिस्तान युद्ध” या शब्दांनी होते. त्यानंतर युद्धसायरनचा आवाज आणि सनी देओलची ओळखीची गर्जना ऐकू येते. ‘आकाशातून, जमिनीवरून किंवा समुद्रातून जिथे जाल तिथे एक भारतीय सैनिक उभा असेल… छाती ठोकून सांगणारा…हा भारत आहे!’ हा संवाद ऐकताच चाहत्यांच्या अंगावर शहारे उभे राहतात. टीझरच्या शेवटी सनी देओल सैन्याला विचारतो, “आपला आवाज कुठपर्यंत पोहोचला पाहिजे?” आणि सामूहिक आवाज येतो“लाहोरपर्यंत!” या एका संवादाने टीझरचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.
नव्या पिढीचे शूर योद्धे
टीझरमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिकांचीही झलक पाहायला मिळते. हवेतून, जमिनीवरून आणि समुद्रातून भारतीय सैन्य शत्रूवर निर्णायक हल्ला करताना दाखवण्यात आले आहे. भव्य दृश्ये, पार्श्वसंगीत आणि देशभक्तीचा ओघ यामुळे टीझर अत्यंत प्रभावी ठरतो.
पोस्टरमुळेही उत्सुकता वाढली
टीझरआधी वरुण धवनने सोशल मीडियावर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले होते. लष्करी गणवेशात दिसणारे चारही कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. “विजय दिन, 1971 चा अभिमान आणि वर्षातील सर्वात भव्य टीझर” असे कॅप्शन देत वरुणने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली होती.
‘बॉर्डर 2’ कधी प्रदर्शित होणार?
‘बॉर्डर 2’ हा 1997 च्या सुपरहिट ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिला चित्रपट लोंगेवाला युद्धावर आधारित होता आणि आजही तो देशभक्तीपटांचा मानदंड मानला जातो. नव्या भागात सनी देओल शीख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिलजीत दोसांझ यांची भूमिका परमवीर चक्र विजेते विंग कमांडर निर्मल जीत सिंग सेखों, तर वरुण धवन यांची व्यक्तिरेखा कर्नल होशियार सिंग दहिया यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.