Kathua Encounter: जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. बिल्लावार भागातील कामड नाला परिसरात लष्कर आणि पोलिसांच्या विशेष पथकाने (SOG) तीन दहशतवाद्यांना घेरले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. वर्ष 2026 मधील हे पहिले मोठे दहशतवादविरोधी ऑपरेशन असल्याचे सांगितले जात आहे.
गुप्त माहितीनंतर शोधमोहीम सुरू
पोलिसांना कामड नाला परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर पोलिसांना पाचारण केले होते. सुरक्षा दलाचे जवान जवळ पोहोचताच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
Op update 1:
Despite darkness, thick vegetation and treacherous terrain, SOG relentlessly engaging the terrorists. Teams of CRPF are also participating in the Joint Op . — IGP Jammu (@igp_jammu) January 7, 2026
हेही वाचा – FASTag Fraud: सावधान! बनावट FASTag वार्षिक पासद्वारे वाहनधारकांची फसवणूक; NHAI कडून सतर्कतेचा इशारा
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऑपरेशनवर लक्ष
या चकमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मूचे पोलीस महानिरीक्षक (IG) भीम सेन तुती आणि कठुआच्या पोलीस अधीक्षक (SSP) मोहिता शर्मा स्वतः या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. आयजी भीम सेन तुती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून या चकमकीला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळू नये यासाठी गावात अतिरिक्त पोलीस कर्मचारी पाठवण्यात आले असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कडक पावले
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली आहे. नुकतेच बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी भागातील सुचलीवारन जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यानंतर आता कठुआमध्ये सुरू असलेल्या या कारवाईत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनी पूर्ण तयारी केली आहे.