Zomato Deepinder Goyal Brain Device: झोमॅटोचे (Zomato) सह-संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल सध्या त्यांच्या व्यवसायापेक्षा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. एका अलीकडील पॉडकास्ट दरम्यान, त्यांच्या कपाळाच्या बाजूला (Temple) असलेल्या एका लहान धातूच्या उपकरणाने (Device) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेटिझन्सनी याला च्युइंगम किंवा चार्जिंग पॅड म्हटले असले, तरी प्रत्यक्षात हे कोट्यवधी रुपयांच्या संशोधनाचा भाग असल्याचे समोर आले आहे.
काय आहे हे 'टेंपल' उपकरण?
हे कोणतेही फॅशन ॲक्सेसरी नसून एक 'प्रायोगिक ब्रेन-मॉनिटरिंग वेअरेबल' (Brain-monitoring wearable) आहे. या उपकरणाला 'टेंपल' असे म्हटले जाते. याचे मुख्य कार्य म्हणजे रिअल-टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाचा मागोवा घेणे. मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा मानवी आरोग्य, विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि प्रामुख्याने वृद्धत्व प्रक्रिया (Aging Process) यांच्याशी संबंधित असतो. मेंदूतील हे बदल टिपण्यासाठी गोयल हे उपकरण वापरत आहेत.
225 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हे संशोधन झोमॅटोचे नसून दीपिंदर गोयल यांचा वैयक्तिक उपक्रम आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 225 कोटी रुपये) गुंतवले आहेत. विशेष म्हणजे, हे उपकरण विकण्यासाठी तयार केलेले नाही, तर मेंदूच्या आरोग्याबद्दल वैज्ञानिक समज वाढवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. गोयल हे गेल्या 1 वर्षापासून हे उपकरण वापरत आहेत.
हेही वाचा – Bluetooth Scam: Bluetooth सतत चालू ठेवल्याने बँक खाते धोक्यात? सायबर ठगांचा नवा फंडा जाणून घ्या
'गुरुत्वाकर्षण आणि वृद्धत्व' यांचा संबंध काय?
हे संपूर्ण संशोधन 'ग्रॅव्हिटी एजिंग हायपोथेसिस' (Gravity Aging Hypothesis) या कल्पनेवर आधारित आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा दीर्घकाळ मानवी शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळे येऊ शकतात आणि व्यक्ती लवकर वृद्ध होऊ शकते. हाच डेटा गोळा करण्याचे काम हे उपकरण करत आहे. सध्या हे उपकरण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही, कारण ते अद्याप प्रायोगिक अवस्थेत आहे. मात्र, आरोग्यासाठी एवढी मोठी गुंतवणूक करणाऱ्या गोयल यांच्या या 'बायोहॅकिंग' प्रयोगाची सध्या टेक जगतात मोठी चर्चा सुरू आहे.