Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजही गोंधळाचे वातावरण कायम राहिले. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच जोरदार घोषणाबाजीमुळे कामकाज पुढे जाऊ शकले नाही आणि अखेर दोन्ही सभागृह तहकूब करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात झालेल्या घोषणांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या रॅलीचा मुद्दा उपस्थित केला. या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आणि काँग्रेसने याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. या वक्तव्यानंतर विरोधी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला आणि सभागृहात गदारोळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले.
राज्यसभेचे कामकाज तहकूब
राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गोंधळ उडाला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा विषय उपस्थित करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आणि माफीची मागणी लावून धरली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाढत्या गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – R-37M Missile India: भारताच्या हवाई ताकदीत मोठी वाढ, रशियाकडून घातक क्षेपणास्त्र खरेदीच्या तयारीत
दरम्यान, भाजपने आपल्या लोकसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे. या व्हीपनुसार 15 ते 19 डिसेंबरदरम्यान सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि मतदान होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या गदारोळावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी सरकारवर पलटवार केला. सरकारच जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज विस्कळीत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा टाळली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सरकारकडून आज अणुऊर्जा विधेयक सादर होण्याची शक्यता असून, ऊर्जा सुरक्षा आणि तांत्रिक प्रगतीच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, सततच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे कायम आहेत.