Telegram Piracy Notice Central Government : प्रसिद्ध मेसेजिंग ॲप 'टेलिग्राम' (Telegram) पुन्हा एकदा भारतातील वाढत्या बेकायदेशीर कृत्यांमुळे केंद्र सरकारच्या कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी चित्रपट आणि ओटीटी (OTT) वरील वेब सीरिजची अनधिकृत पायरसी रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला अत्यंत कडक शब्दांत नोटीस बजावली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत टेलिग्रामला पायरसी रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
क्रिएटर इकॉनॉमीचे नुकसान आणि सरकारचा 15 दिवसांचा अल्टिमेटम
चित्रपट किंवा कोणतीही मोठी वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिचे पायरेटेड व्हर्जन टेलिग्रामच्या विविध चॅनेल्स आणि ग्रुप्सवर बेकायदेशीरपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. या प्रकारामुळे भारतीय चित्रपट उद्योग आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्राचे दरवर्षी अब्जावधी रुपयांचे नुकसान होत असून निर्माते, कलाकार आणि वितरकांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. देशातील 'क्रिएटर इकॉनॉमी' सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने टेलिग्रामला पुढील गोष्टींचे निर्देश दिले आहेत:
– ॲक्शन टेकन रिपोर्ट (ATR): पायरसी पूर्णपणे रोखण्यासाठी कंपनीने नेमके काय उपाय केले, याचा सविस्तर अहवाल 15 दिवसांच्या आत सरकार दरबारी सादर करावा लागेल.
– बेकायदेशीर चॅनेल्सवर बंदी: बेकायदेशीरपणे चित्रपट आणि ओटीटी कंटेट मोफत पुरवणाऱ्या सर्व चॅनेल्स आणि ग्रुप्सवर तातडीने आळा घालणे बंधनकारक असेल.
युझरनेम फीचर आणि सायबर सुरक्षेचा नवा पेच
टेलीग्राम समोरील अडचणी केवळ पायरसीपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही (MeitY) या मेसेजिंग ॲपसह 'सिग्नल' (Signal) ला आणखी एक नोटीस धाडली आहे. या दोन्ही ॲप्समधील 'युझरनेम' फीचरचा गैरवापर करून लोकांची फसवणूक केली जात असून दुसऱ्याच्या नावाने बनावट अकाऊंट्स तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या सायबर गुन्ह्यांवर सरकारने टेलिग्रामकडून स्पष्टीकरण मागितले असून, यापूर्वी 'मेटा' कंपनीच्या व्हॉट्सॲपलाही अशाच स्वरूपाची नोटीस बजावण्यात आली आहे.
वाढत्या निर्बंधांमुळे टेलिग्रामच्या अडचणीत भर
– NEET पेपर लीक प्रकरण: यापूर्वी जून महिन्यात NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणात गैरवापर झाल्याच्या संशयावरून टेलिग्रामवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले होते.
– आगामी काळातील संकट: एकामागून एक समोर येणारी पायरसी, सुरक्षा त्रुटी आणि पेपर लीक प्रकरणांमधील संशयास्पद वापरामुळे केंद्र सरकारने कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या काळात टेलिग्रामच्या भारतातील भवितव्यावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Whatsapp चं नवीन फिचर वादात, केंद्राने उपस्थित केले प्रश्न, कंपनीने दिली प्रतिक्रिया