Income Tax India: आर्शिक वर्ष (AY) 2026-27 साठी सुरू असलेल्या अग्रिम कर ई-मोहिमेअंतर्गत अनेक करदात्यांना चुकीची माहिती असलेले ईमेल्स प्राप्त झाले आहेत. या तांत्रिक चुकीमुळे करदात्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, आयकर विभागाने शनिवारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून स्पष्टीकरण जारी केले आहे. विभागाने ही चूक मान्य केली असून करदात्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.
सेवा पुरवठादारासोबत तांत्रिक त्रुटी सुधारण्याचे काम सुरू
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही करदात्यांना त्यांच्या ‘महत्त्वाच्या व्यवहारां’बाबत (Significant Transactions) चुकीचे तपशील असलेले ईमेल्स गेले आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर विभाग आता आपल्या तांत्रिक सेवा पुरवठादारासोबत ही समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. “ही चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आम्ही करदात्यांचे आभारी आहोत,” असेही विभागाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे गेलेले हे संदेश सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
जुने ईमेल्स दुर्लक्षित करण्याचे आवाहन
आयकर विभागाने करदात्यांना स्पष्टपणे आवाहन केले आहे की, मूल्यांकन वर्ष 2026-27 च्या संदर्भात यापूर्वी पाठवण्यात आलेले ईमेल्स त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित करावेत. विभागाने स्पष्ट केले की, हे ईमेल्स केवळ करदात्यांच्या सोयीसाठी आणि स्मरणपत्र म्हणून पाठवले जातात, जेणेकरून त्यांना आपल्या आर्थिक माहितीचा आढावा घेता येईल. त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे करदात्यांनी घाबरून जाऊ नये, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
KIND ATTENTION TAXPAYERS!
Clarification has been issued regarding certain email communications sent under the Advance Tax e-Campaign for AY 2026–27 (FY 2025–26)@nsitharamanoffc @officeofPCM @FinMinIndia @PIB_India pic.twitter.com/ZVcjSyBo6q — Income Tax India (@IncomeTaxIndia) March 14, 2026
व्यवहारांचे तपशील पडताळून पाहण्याचा सल्ला
करदात्यांनी अचूक माहितीसाठी ई-फायलिंग पोर्टलद्वारे ‘अनुपालन पोर्टल’ (Compliance Portal) वर जावे, असा सल्ला विभागाने दिला आहे. तिथे असलेल्या ‘ई-मोहीम’ (e-Campaign) टॅबच्या माध्यमातून आपल्या व्यवहारांचे मूळ तपशील पडताळून पाहता येतील. योग्य माहिती मिळाल्यानंतरच करदात्यांनी लागू असलेल्या अग्रिम कर नियमांचे पालन करावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.