Sustainable Aviation Fuel Market : जगभरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत उपायांचा शोध सातत्याने घेतला जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आता विमान वाहतूक क्षेत्रात देखील कार्बन डायऑक्साइडचे घातक उत्सर्जन रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. दक्षिण कोरिया सरकारने हवाई क्षेत्रातील जुन्या आणि प्रदूषण पसरवणाऱ्या जेट फ्युएलवर असणारे अवलंबित्व हळूहळू कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत येणाऱ्या काळात विमान कंपन्यांनी पर्यावरणाला पूरक असलेल्या इंधनाचा वापर करावा, जेणेकरून हवेतील प्रदूषण वेगाने आटोक्यात आणता येईल, असा सरकारचा मानस आहे.
सस्टेनेबल एविएशन फ्युएल असते अधिक इको-फ्रेंडली
पारंपारिक इंधनाच्या तुलनेत सस्टेनेबल एविएशन फ्युएल (SAF) हे अधिक इको-फ्रेंडली मानले जाते. या विशेष इंधनाची निर्मिती करण्यासाठी एथेनॉल, शेतातील पिकांचे अवशेष (कृषी कचरा), पूर्वी वापरलेले कुकिंग ऑईल आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. विमान हवेत उडत असताना उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचे प्रमाण कमी करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. दक्षिण कोरियाने आता याच एथेनॉल-आधारित सस्टेनेबल एविएशन फ्युएलच्या उत्पादनाला आणि वापराला गती देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्यासाठी वेगाने काम
भारताचा विचार केल्यास, आपला देश देखील बऱ्याच काळापासून बायोफ्यूल क्षेत्रात वेगाने काम करत आहे. आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्यासाठी भारतात पेट्रोलमध्ये एथेनॉल मिक्स करण्याची मोहीम (एथेनॉल ब्लेंडिंग) मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. केवळ रस्त्यावरील वाहनेच नाही, तर भारतामध्ये विमान वाहतुकीसाठी सस्टेनेबल एविएशन फ्युएल तयार करण्याबाबत आणि त्याच्या व्यावहारिक विकासावर सध्या संशोधनाचे काम वेगाने सुरू आहे.
परंतु, सध्याच्या घडीला पारंपारिक जेट फ्युएल पूर्णपणे बंद करणे इतके सोपे नाही. विमानांचे आधुनिक इंजिन, इंधनाचा पुरवठा करणारी यंत्रणा आणि देशातील एकूण उत्पादन क्षमता या आघाड्यांवर अजूनही अनेक मोठी आव्हाने कायम आहेत. त्यामुळे येत्या काळात विमानांमध्ये थेट 100 टक्के हे नवीन इंधन वापरण्याऐवजी, सुरुवातीला सस्टेनेबल एविएशन फ्युएल हे जुन्या जेट फ्युएलमध्ये ठराविक प्रमाणात मिक्स करून वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.