Swaraj Kaushal Passes Away: माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. दिल्ली भाजपने अधिकृतरित्या त्यांच्या निधनाची माहिती देत सांगितले की त्यांच्यावर गुरुवारीच लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह कायदा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
राजकीय नेत्यांकडून शोकसंदेश
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत म्हटले, 'मिझोरामचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील श्री. स्वराज कौशल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. या कठीण काळात खासदार बांसुरी स्वराज आणि त्यांच्या कुटुंबियांस माझ्या संवेदना.'
हेही वाचा – Pahalgam Attack: असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला? इम्रान खानच्या जवळच्या सहकाऱ्याचा खळबळजनक आरोप
दरम्यान, भाजपचे नेते सतीश उपाध्याय यांनीही हळहळ व्यक्त केली. त्यांनी लिहिले, 'स्वराज कौशल यांनी प्रामाणिकपणा आणि समर्पणाने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने एक आदर्श, संयमी आणि न्यायनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले.'
बांसुरी स्वराज यांची भावनिक प्रतिक्रिया
आपल्या वडिलांच्या निधनानंतर बांसुरी स्वराज यांनी एक्सवर भावूक संदेश शेअर केला. त्यांनी लिहिले, 'पप्पा… तुमचे प्रेम, शिस्त, साधेपणा आणि देशभक्ती हा माझ्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वेदना असह्य आहे, पण तुमचा वारसा आणि मूल्ये माझ्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करतील. ओम शांती.' बांसुरी स्वराज यांनी आई सुषमा स्वराज यांच्या आठवणींचा उल्लेख करत लिहिले की त्यांच्या वडिलांचे आत्मा आता आईसोबत शांततेत एकत्र झाला आहे. स्वराज कौशल यांच्या निधनामुळे भारतीय राजकारण, न्यायव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या योगदानाचा ठसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.