Surya Grahan August 2026 : चालू वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी लागणार आहे. विशेष म्हणजे 11 ऑगस्ट रोजी आषाढ शिवरात्री साजरी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हे ग्रहण होणार असून, या दिवशी आषाढ महिन्यातील दर्श अमावस्या देखील आहे. या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण किंवा खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse) होणार असून, धार्मिक आणि खगोलीय दोन्ही दृष्टिकोनातून या दुर्मिळ योगाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूर्यग्रहणाची वेळ आणि भारतात दिसणार की नाही?
भारतीय वेळेनुसार (IST), हे सूर्यग्रहण 12 ऑगस्टच्या रात्री 9:04 वाजता सुरू होईल आणि उशिरा रात्री 1:27 वाजता समाप्त होईल. या दरम्यान रात्री 11:17 वाजता सूर्यग्रहण त्याच्या सर्वोच्च शिखरावर (Peak) असेल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्रीच्या वेळी होत असल्याने भारतात ते कुठेही दिसणार नाही.
जगातील 'या' देशांमध्ये दिसणार हे नयनरम्य दृश्य
खगोलीय गणनेनुसार, 12 ऑगस्टचे हे पूर्ण सूर्यग्रहण प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील (Northern Hemisphere) देशांमध्ये दिसणार आहे.
– पूर्ण सूर्यग्रहण: ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि अटलांटिक महासागराच्या काही भागांत हे खग्रास रूपात स्पष्ट दिसेल.
– आंशिक सूर्यग्रहण: युरोपमधील बहुतांश देश, उत्तर अमेरिकेतील काही भाग आणि आफ्रिकेच्या उत्तर-पश्चिम भागात हे आंशिक (Partial) रूपात नजरेस पडेल.
हेही वाचा – Shravan 2026: हर हर महादेव! श्रावण कधी सुरू होणार? जाणून घ्या तारीख अन् पूजेचं महत्त्व
सूतक काळ पाळावा की नाही? अन् ज्योतिषीय महत्त्व
धार्मिक नियमांनुसार सूर्यग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी सुरू होतो, परंतु हे नियम केवळ ग्रहण दिसणाऱ्या ठिकाणीच लागू होतात. भारतात हे ग्रहण दृश्यमान नसल्याने येथे सूतक काळ मान्य असणार नाही. त्यामुळे मंदिरांचे दरवाजे खुले राहतील आणि सर्व धार्मिक व मांगलिक कार्ये नेहमीप्रमाणे पार पडतील. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी मिथुन राशीत मंगळ, बुध आणि राहु-केतु यांच्या समसप्तक योगामुळे विशेष ग्रहस्थिती निर्माण होत आहे, ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल.
सूर्यग्रहणाच्या दिवशी काय करावे?
जरी सूतक काळ पाळायचा नसला तरी धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात खालील गोष्टी करणे शुभ मानले जाते:
– मंत्रजप: ग्रहण कालावधीत सूर्यमंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा मानसिक जप करावा.
– दानधर्म: दर्श अमावस्या आणि ग्रहणाचा योग असल्याने गरजू व्यक्तींना तीळ, वस्त्र, अन्न किंवा द्रव्याचे दान करावे.
– वृक्षारोपण: दर्श अमावस्या आषाढात येत असल्याने या वेळेस झाड लावणे आणि ते जगवणे सोपे असते. तेव्हा या दिवसाचे औचित्य साधून या दिवशी निसर्गरक्षणासाठी किमान एक तरी झाड लावावे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)