Suraj Chavan Post: दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे कणखर नेते अजित पवार यांची आज, 22 जुलै रोजी पहिली शासकीय जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या आकस्मिक एक्झिटमुळे राज्यभरात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातून दादांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच, ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाण याने शेअर केलेल्या अत्यंत संवेदनशील व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड हळवे झाले आहेत.
सूरज चव्हाणच्या पडत्या काळात अजितदादांनी त्याला केवळ मदतीचा हातच दिला नाही, तर त्याच्यासाठी हक्काचे घर बांधून देण्यातही मुख्य भूमिका बजावली होती. याच कृतज्ञतेच्या भावनेतून सूरजने आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, “माझ्यासाठी अजितदादा केवळ राजकीय व्यक्ती नव्हते, तर ते देवतुल्य होते. देवाला कधी पाहिले नाही, पण दादांच्या रूपात ते रूप प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.” दादांच्या पाठीवरील हात सुटल्याची वेदना व्यक्त करत सूरजने ही भक्ती आणि प्रेम आयुष्यभर मनात जपून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यभरात आज ठिकठिकाणी अजितदादांच्या स्मृतीस अभिवादन करणारे उपक्रम राबवले जात आहेत. अशातच सूरजने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि भावूक प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय पदांपेक्षाही अजितदादांनी सर्वसामान्य जनतेच्या आणि विशेषतः तळागाळातील घटकांच्या मनात कमावलेले आपुलकीचे स्थान किती घट्ट होते, याचीच प्रचिती सूरजच्या या हृदयस्पर्शी पोस्टमधून पुन्हा एकदा समोर आली आहे.