OBC Reservation : ओबीसी आरक्षणातील 'क्रिमीलेयर' (Creamy Layer) ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ पालकांचे वेतन हा ओबीसी उमेदवारांना क्रिमीलेयरमध्ये समाविष्ट करण्याचा एकमेव निकष असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर हा निकाल दिला. या निर्णयामुळे UPSC उत्तीर्ण झालेल्या शेकडो ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने काही उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे कारण देत त्यांना सरसकट क्रिमीलेयरमध्ये टाकले होते. यामुळे या उमेदवारांना ओबीसी आरक्षणाचा लाभ नाकारण्यात आला होता. याविरुद्ध उमेदवारांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) आणि उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिथे उमेदवारांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की:
8 सप्टेंबर 1993 च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार (OM) क्रिमीलेयर ठरवण्याचे निकष स्पष्ट आहेत.
उत्पन्न आणि संपत्तीची गणना करताना वेतन (Salary) आणि शेतीपासून मिळणारे उत्पन्न (Agricultural Income) एकत्र करून विचारात घेता येत नाही.
केवळ उत्पन्नाच्या आकड्यांवर आधारित यांत्रिक पद्धतीने क्रिमीलेयर ठरवणे हे आरक्षण धोरणाच्या मूळ उद्देशाला बाधक ठरू शकते.
समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील (PSU) कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वेगवेगळे निकष लावणे हे संविधानाच्या कलम 14 (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन आहे. समान सामाजिक आणि आर्थिक स्थितीत असलेल्या उमेदवारांशी सरकार वेगळा व्यवहार करू शकत नाही. क्रिमीलेयरची संकल्पना ही केवळ आर्थिक नसून ती सामाजिकदृष्ट्या प्रगत घटकांना आरक्षणातून वगळण्यासाठी आहे. त्यामुळे पालकांचे पद, त्यांची सामाजिक स्थिती आणि इतर घटकांचा विचार करणे अनिवार्य आहे.
सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संबंधित उमेदवारांच्या ओबीसी नॉन-क्रिमीलेयर स्थितीचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. जे उमेदवार पात्र ठरतील, त्यांना आवश्यक असल्यास अतिरिक्त पदे निर्माण करून सेवा वाटप (Service Allocation) करावे, असेही न्यायालयाने बजावले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील 6 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे कडक निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयामुळे 2004 मधील त्या पत्राला कायदेशीर आधार उरलेला नाही, ज्याद्वारे केवळ वेतनाच्या आधारावर क्रिमीलेयर ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता.
न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे
या निकालाच्या माध्यमातून न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीतील काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत:
1. केवळ उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा उमेदवाराच्या पालकांचे पद आणि सामाजिक प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची आहे.
2. शेतीचे उत्पन्न हे व्यावसायिक उत्पन्नात धरले जाऊ नये.
3. केंद्र सरकारने आरक्षणाचे फायदे खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी निकषांची काटेकोरपणे आणि पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी.
या निर्णयामुळे प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या अनेक गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
हेही वाचा – UPSC CMS Exam: वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC CMS 2026 ची अधिसूचना जारी; 'असा' करा अर्ज