Share Market Closing: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच शुक्रवार कमालीचा फायदेशीर ठरला. जागतिक बाजारातून मिळालेले पॉझिटिव्ह संकेत आणि आयटीसह हेल्थकेअर शेअर्समधील चौफेर खरेदीच्या जोरावर बाजाराने सलग 3 च्या सत्रात तेजीचा झेंडा फडकवला. दिवसभराच्या चढ-उतारानंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 261.79 अंकांनी वधारून 77,763.91 च्या पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 95.15 अंकांची झेप घेत 24,270.85 वर बंद झाला. या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे.
आयटी आणि हेल्थकेअर शेअर्स ठरले बाजाराचे 'हिरो'
आजच्या तेजीचे मुख्य नेतृत्व आयटी (माहिती तंत्रज्ञान) आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी केले. निफ्टी इंडेक्सवर HCL Technologies, Max Healthcare, Bajaj Finserv, Apollo Hospitals आणि Dr. Reddy's Labs या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. अमेरिकेत लवकरच व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यामुळे आयटी इंडेक्समध्ये तब्बल 1.7 टक्केची शानदार वाढ पाहायला मिळाली. भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा व्यवसाय अमेरिकेवर अवलंबून असल्याने या संभाव्य कपातीचा त्यांना सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे.
रिअल्टी आणि फार्मा क्षेत्राची कमाल; पण बँकिंग क्षेत्रात घसरण
क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार केल्यास, आज स्थावर मालमत्ता म्हणजेच रिअल्टी क्षेत्राने सर्वांना मागे टाकत तब्बल 2 टक्के ची झेप घेतली. त्याखालोखाल फार्मा आणि हेल्थकेअर इंडेक्सनेही 2 टक्केची वाढ नोंदवली, तर मेटल शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली. मात्र, दुसरीकडे बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्राला या तेजीचा फायदा घेता आला नाही. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स 1.5 टक्केने घसरल्याचे पाहायला मिळाले, तर एनर्जी इंडेक्समध्येही 1.3 टक्केची घसरण नोंदवली गेली.
बाजारात अचानक आलेल्या या तेजीमागील 3 मुख्य कारणे
FIIs च्या विक्रीला ब्रेक
गुंतवणूकदारांकडून (FIIs) होणाऱ्या समभागांच्या विक्रीचा वेग कमालीचा मंदावला असून, त्यामुळे बाजाराला मोठा पाठिंबा मिळाला.
अमेरिकेतील घडामोडी
अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढल्याने भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेत परदेशी गुंतवणूक वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
कच्च्या तेलाचे घसरलेले दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती युद्धपूर्व पातळीवर आल्या आहेत. तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी ठरली.