Kaur Vs Kore : पापाराझी एंटरटेनमेंट कंपनीने (Paparazzi Entertainment Company) भारताचा पहिला एआय (AI) फीचर फिल्म 'कौर Vs कोर' (Kaur Vs Kore) ची घोषणा करून सिने जगतात एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भावनिक कथा यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. सनी लिओनी यात एका मानवी सुपरहिरो आणि एका एआय-शक्ती असलेल्या अवताराच्या अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
'कौर Vs कोर' मध्ये पारंपरिक दृश्यांसह तंत्रज्ञानाने बनवलेली दृश्येही
'कौर Vs कोर' हा केवळ एक व्हिज्युअल चमत्कार नसून, तो चित्रपट निर्मितीच्या भविष्यातील एका मोठ्या बदलाचे संकेत देतो. एआय-निर्मित संगीत व्हिडिओ, जाहिराती आणि शॉर्ट फिल्म्समध्ये नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पापाराझी एंटरटेनमेंटने आता या महत्त्वाकांक्षी पूर्ण-लांबीच्या चित्रपटासह भारतीय सिनेमाला नवी दिशा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सनी लिओनी काय म्हणाली?
या प्रोजेक्टबद्दल बोलताना सनी लिओनी म्हणाली, "आठ वर्षांपूर्वी आम्ही 'कोर' नावाचे पात्र तयार केले होते आणि VFX वापरून एक छोटा प्रोमो शूट केला होता. पण तेव्हा हे पात्र स्वीकारले जाईल, असे आम्हाला वाटले नव्हते. त्यावेळी तंत्रज्ञान आजच्या स्तरावर नव्हते, म्हणूनच आता भारताचा पहिला पूर्ण एआय सुपरहिरो चित्रपट बनवताना मी खूप उत्सुक आहे."
"तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारत नेहमीच पुढे आहे आणि या चित्रपटाचा पाया रचण्यात सहभागी होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. सिनेमा मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. आम्ही केवळ भारतीय सिनेमातच नाही, तर एआय तंत्रज्ञानाचे नेतृत्व करत जगाला याबद्दल दाखवण्यासाठी उत्सुक आहोत," असेही तिने सांगितले.
चित्रपटाच्या निर्मात्यांचे मत
चित्रपटाबद्दल बोलताना पापाराझी एंटरटेनमेंट कंपनीचे संस्थापक, निर्माते अजिंक्य जाधव म्हणाले, "सनी लिओनीची 'कौर Vs कोर' मधील दुहेरी अवतारातील सुपरहिरोची भूमिका परंपरा आणि भविष्यवादाचा संगम आहे. हे पुनर्शोध, सामर्थ्य आणि जागतिक आकर्षणाचे प्रतीक आहे. हा चित्रपट केवळ आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सिनेमासाठी नवीन पायंडा पाडत आहे. एका नामांकित अभिनेत्रीसोबत भारताचा पहिला पूर्ण-लांबीचा एआय फीचर फिल्म बनवून, आम्ही इतरांसाठी हे दरवाजे उघडत आहोत आणि एआय-नेतृत्वाखालील सिनेमाच्या जागतिक नकाशावर भारताला ठामपणे स्थापित करत आहोत."
दिग्दर्शक आणि क्रिएटर विनिल वासू म्हणाले, "कौर Vs कोर हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक सिनेमॅटिक प्रयोग आहे, जो पारंपरिक सीमांना आव्हान देतो. एआयचा जबाबदारपणे वापर करून जागतिक सिनेमाशी स्पर्धा करेल अशा भावना, ड्रामा आणि व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करणे हे माझे उद्दिष्ट होते. भारतीय चित्रपट निर्माते नवनवीन शोध लावण्यास घाबरत नाहीत आणि भारत एआय सिनेमाच्या चळवळीचे नेतृत्व करू शकतो, हे हा प्रोजेक्ट जगाला दाखवतो."
हेही वाचा – AR Rahman: दिल्ली उच्च न्यायालयाचा ए. आर. रहमानला तात्पुरता दिलासा; ‘या’ खटल्यात एकल न्यायाधीशांचा आदेश रद्द
तंत्रज्ञानाचा वापर
या चित्रपटात एआयच्या क्षमतांचा उपयोग करून फोटोरिअलिस्टिक व्हिज्युअल्स, क्लिष्ट वर्ल्ड-बिल्डिंग, डी-एजिंग तंत्रज्ञान आणि हाय-ऑक्टेन ॲक्शन यांचा अनोखा संगम साधला जाणार आहे. सनी लिओनीची 'कौर Vs कोर' मधील दुहेरी भूमिका तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा असून, एआय-आधारित सिनेमातील ट्रेलब्लेझर (मार्गदर्शक) म्हणून भारताची भूमिका मजबूत करते.