Sunny Deol Angry On Paparazzi: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अलीकडेच श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर ते आता सुरक्षितपणे घरी परतले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी चाहत्यांसह माध्यमांचे प्रतिनिधी घराबाहेर जमले आहेत. याच कारणामुळे आज सकाळी त्यांचा मुलगा, अभिनेता सनी देओल संतापलेला दिसला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल घराबाहेर येऊन पापाराझींवर जोरात ओरडताना दिसत आहे. तो म्हणतो, “तुम्हाला लाज वाटत नाही का? घरी तुमचे आईवडील नाहीत का?” त्यावेळी सनी हात जोडून पापाराझींना शांत राहण्याची विनंती करतो, पण त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि वडिलांची चिंता स्पष्ट जाणवत होती.
सनीने साधा शर्ट आणि घरातील कपडे परिधान केलेले असून, व्हिडिओत त्याचा तणावपूर्ण चेहरा स्पष्ट दिसतो. या प्रसंगानंतर चाहत्यांनी सनीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत लिहिलं, “तो बरोबर आहे, गोपनीयतेचा भंग थांबवायला हवा.” काहींनी लिहिलं, “कोणीही आपल्या आजारी वडिलांच्या काळजीत असताना असेच वर्तन करेल.”
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. हेमा मालिनी यांनी स्वतः पुढे येऊन या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आणि लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. मुलगी ईशा देओल हिने देखील सोशल मीडियावरून वडिलांची तब्येत सुधारत असल्याचं अपडेट दिलं होतं. धर्मेंद्र रुग्णालयात असताना सनी आणि बॉबी देओल दोघेही भावनिक झाले होते. गाडीत बसताना सनीचे डोळे ओले झालेले दिसले, तर बॉबीलाही स्वतःला सावरताना अवघड जात होतं. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघेही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते.