Ayodhya Dham Meat Ban: अयोध्या धामचे पावित्र्य आणि धार्मिक महत्त्व जपण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्या धाम आणि पंचकोसी परिक्रमा परिसरात मांसाहारी अन्न विक्रीवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही बंदी केवळ दुकाने किंवा हॉटेल्सपुरती मर्यादित नसून ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनाही लागू असणार आहे.
तक्रारींनंतर प्रशासनाचे कडक पाऊल
राम मंदिर परिसर आणि आसपासच्या क्षेत्रात मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला आधीच मनाई होती. मात्र, काही हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टेमध्ये राहणारे पर्यटक ऑनलाइन ॲप्सद्वारे मांसाहारी पदार्थ मागवत असल्याच्या तक्रारी वारंवार प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सहाय्यक अन्न आयुक्तांनी अयोध्या छावणीतील सर्व हॉटेल्स आणि ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांना स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.
हेही वाचा – Sirmaur Bus Accident: हिमाचल प्रदेशात खासगी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून प्रवाशांचा अंत
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
सहाय्यक अन्न आयुक्त माणिक चंद्र सिंह यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्या धाम आणि परिक्रमा क्षेत्राची पवित्रता राखणे ही आमची प्राथमिकता आहे. जर कोणत्याही हॉटेल, ढाबा किंवा ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीने या नियमाचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हेही वाचा – Pregnancy Job Scam : गर्भवती राहा अन् 10 लाख कमवा ! बिहारमध्ये सायबर भामट्यांचा विचित्र घोटाळा उघड
काय आहेत नवीन नियम?
अयोध्या धाम आणि पंचकोसी परिक्रमा परिसरात कोणत्याही प्रकारचे मांस किंवा मांसाहारी पदार्थ विकता येणार नाहीत. तसेच झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांना या विशिष्ट क्षेत्रात मांसाहारी अन्नाची डिलिव्हरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. होमस्टे आणि गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना मांसाहार दिला जाणार नाही याची जबाबदारी मालकांवर असेल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अयोध्येच्या धार्मिक अधिष्ठानाला अधिक बळकटी मिळणार आहे. भाविक आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.