Strait of Hormuz Expansion by Iran : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या शिखर परिषदेच्या काही काळ आधीच इराणने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. खनिज तेलाच्या वाहतुकीसाठी जगातील सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या हॉर्मुझची सामुद्रधुनी क्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. इराणच्या या अचानक घेतलेल्या पावलामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केलेल्या समुद्री सीमेची व्याख्याच बदलली असून, आता इराणचा प्रभाव थेट मोकळ्या समुद्रापर्यंत पोहोचला आहे. यामुळे जागतिक तेल व्यापारावर इराणची पकड अधिक घट्ट झाली आहे.
समुद्री सीमा विस्तारण्याचे नवे गणित
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे अधिकारी मोहम्मद अकबरजादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ही सामुद्रधुनी फक्त काही बेटांपुरती मर्यादित न राहता शेकडो मैल लांब असेल. इराणच्या नव्या दाव्याप्रमाणे ही हद्द आता आग्नेय इराणमधील ‘जास्क’ किनाऱ्यापासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ‘जास्क’ हे ठिकाण पर्शियन आखाताच्या बाहेर ओमानच्या उपसागरात येते. याचा अर्थ असा की, इराणने आपल्या प्रभावाचा विस्तार आता थेट मोकळ्या समुद्रात केल्याने नौदलाच्या हालचालींवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम
जगातील एकूण खनिज तेल व्यापारापैकी सुमारे 20 टक्केपुरवठा याच मार्गातून होतो, ज्यामुळे हा भाग जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानला जातो. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या तणावामुळे हा मार्ग आधीच धोक्यात आला होता, मात्र इराणच्या नव्या भूमिकेमुळे आशिया आणि युरोपमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीन आपल्या गरजेच्या साधारण 12 टक्के तेल एकट्या इराणकडून घेतो. त्यामुळे इराणच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे शी जिनपिंग यांच्यासमोर मोठे आर्थिक आणि राजकीय संकट उभे ठाकले आहे.
हेही वाचा – India Foreign Politics : भारताचा पुन्हा एकदा विश्वासघात! या शेजाऱ्याचा पाकिस्तानसोबत महत्त्वाचा करार
महासत्तांच्या चर्चेवर युद्धाचे सावट
डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावर जात असताना आणि शी जिनपिंग यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार असतानाच इराणने ही खेळी खेळली आहे. या दोन्ही महासत्तांच्या भेटीत इराण युद्धाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार होता, पण ट्रम्प बीजिंगमध्ये पोहोचण्यापूर्वीच इराणने नवा डाव टाकला आहे. यातून इराणने हे स्पष्ट केले आहे की, भविष्यात जर या युद्धावर कोणताही तोडगा काढायचा असेल, तर जगाला इराणने विस्तारलेल्या या नवीन समुद्री सीमेचा आणि अटींचा विचार करावाच लागेल.
वॉशिंग्टन आणि बीजिंगसाठी धोक्याची घंटा
इराणने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही महासत्तांना एकाच वेळी इशारा मिळाला आहे. इराण आपल्या समुद्री हद्दीत कोणताही परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे अकबरजादे यांनी ठणकावून सांगितले आहे. आता ट्रम्प आणि जिनपिंग या नव्या पेचातून काय मार्ग काढतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणच्या या भौगोलिक विस्तारामुळे रसद पुरवठाच नव्हे, तर युद्धाचा धोकाही कित्येक पटीने वाढला असून जागतिक तेल बाजारात अस्थिरतेचे सावट पसरले आहे.