E20 Janata Party: इथेनॉल-मिश्रित E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापराबाबत देशभरातील वाहनचालकांमध्ये वाढणारा असंतोष आता एका नव्या डिजिटल चळवळीच्या स्वरूपात समोर आला आहे. जंतरमंतरवरील निदर्शनांनंतर हा मुद्दा पुन्हा पेटला असून, NEET पेपरफुटी प्रकरणी सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) धर्तीवर आता सोशल मीडियावर ‘E20 जनता पार्टी’ची स्थापना झाली आहे. उपरोध, मीम्स आणि थेट प्रश्नांच्या माध्यमातून ही मोहीम चालवली जात आहे. इंधन केंद्रांवर E20 पेट्रोलसोबतच 100% शुद्ध (इथेनॉल-मुक्त) पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला जावा, ही या गटाची मुख्य मागणी आहे.
दरम्यान, ‘X’ (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली ही मोहीम स्वतःला ‘ग्राहक हक्क चळवळ’ म्हणून मांडते. सरकारकडून कोणत्याही प्रकारची सबसिडी किंवा मोफत इंधन न मागता, अथवा इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर पूर्ण बंदीची मागणी न करता, केवळ ‘ग्राहकांच्या निवडीचे स्वातंत्र्य’ आणि ‘पारदर्शकता’ मिळवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
? STOP EXPERIMENTING ON OUR CARS! INDIA DEMANDS CHOICE OF FUEL! Our vehicles are NOT test machines. We bought them with our hard-earned money after paying taxes years in advance. We are a middle-class majority country, and fuel efficiency + vehicle performance directly impacts… pic.twitter.com/6wI0vquOCP — E20 JANTA PARTY (@E20Party) July 26, 2026
E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज घटत आहे, इंजिनचे भाग खराब होऊन देखभालीचा खर्च वाढत आहे आणि वाहनांच्या एकूण आयुर्मानावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा वाहनमालक करत आहेत. यावर उपाय म्हणून सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचे स्पष्ट लेबलिंग करावे, तसेच विविध इंधन मिश्रणांच्या प्रभावाबाबतचे स्वतंत्र संशोधन पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मे 2026 मध्ये NEET पेपरफुटीविरोधात ज्या उपरोधिक शैलीत CJP ने लढा उभारला होता, त्याच मार्गाने जात ‘E20 जनता पार्टी’ सोशल मीडियाद्वारे कार आणि बाईक मालकांना संघटित करत आहे. जरी ही कोणतीही अधिकृत राजकीय संघटना किंवा रस्त्यावर उतरणारी चळवळ नसली, तरी तिला डिजिटल विश्वात मोठा पाठिंबा मिळत आहे. ‘X’ वर 13,000 हून अधिक आणि इन्स्टाग्रामवर 8,800 हून अधिक फॉलोअर्स असलेल्या या मोहिमेमुळे आता पेट्रोल पंपांपासून ते धोरणकर्त्यांच्या वर्तुळापर्यंत E20 इंधनाच्या धोरणावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.