Share Market Closing: भारतीय शेअर बाजाराने जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता करार होण्याच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेतील राजकीय तणाव कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करत असल्याने तेलाच्या किमती कमी होणे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरले. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याने मुंबई शेअर बाजाराचा (BSE) एकूण बाजार विस्तार (मार्केट कॅप) पुन्हा एकदा 5 ट्रिलियन डॉलरच्या पार गेला असून, बाजाराने 6 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली आहे.
अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांची चांदी; बाजारमूल्यात प्रचंड वाढ
गेल्या 4 सत्रांपासून बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे बीएसईवर नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात 6 टक्के हून अधिक वृद्धी झाली आहे. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचा विचार केला तर या मूल्यात तब्बल 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या अभूतपूर्व तेजीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने 5 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पुन्हा सर केला, जो यापूर्वी 8 मे रोजी गाठला गेला होता.
लार्ज-कॅपच्या तुलनेत मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सची दमदार कामगिरी
सध्याच्या घोडदौडीत मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला खरी ताकद दिली आहे. एप्रिल महिन्यापासून मुख्य निर्देशांक सेन्सेक्समध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी बीएसई मिड-कॅप इंडेक्सने 16 टक्के आणि स्मॉल-कॅप इंडेक्सने 23 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. तर मायक्रो-कॅप इंडेक्समध्ये तब्बल 26 टक्क्यांची अफाट वाढ नोंदवली गेली आहे.
हेही वाचा – EPFO 3.0: पीएफ धारकांसाठी मोठी बातमी; आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार पैसे; 'EPFO 3.0' ची चाचणी यशस्वी
परदेशी संस्थांची नफाखोरी सुरूच; देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सावरली कमान
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) बाजारात सातत्याने शेअर्सची विक्री केली जात आहे. मात्र, असे असूनही देशांतर्गत गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे भारतीय बाजार भक्कमपणे उभा आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत ही जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या काळात बँकिंग, टेलिकॉम आणि IT क्षेत्रात आणखी सकारात्मक सुधारणा अपेक्षित असून, परदेशी गुंतवणूकदार परत आल्यास बाजाराला अधिक गती मिळेल. सध्या निवडक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.