Share Market Closing: भारतीय शेअर बाजारात बुधवारी कमालीची चढ-उतार पाहायला मिळाली. दिवसभर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असतानाच, सत्राच्या शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'बीएसई सेन्सेक्स' 130.49 अंकांच्या वाढीसह 77,185.43 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 'निफ्टी' 26.45 अंकांनी वधारून 24,078.50 वर स्थिरावला. आजच्या सत्रात विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU Banks) आणि कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या शेअर्सना गुंतवणूकदारांनी पसंती दिली.
'निफ्टी पीएसयू बँक' निर्देशांकाने बाजारात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत जवळपास 1 टक्केची वाढ मिळवली. यासोबतच तेल आणि वायू (Oil & Gas), बँकिंग, ऊर्जा, फार्मा आणि ग्राहक टिकाऊ वस्तू (Consumer Durables) या क्षेत्रांतील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बीएसईच्या कॅपिटल गुड्स निर्देशांकाने सर्वाधिक 1.27 टक्केची झेप घेत बाजाराचे नेतृत्व केले. मात्र, बाजारात तेजी असतानाही काही क्षेत्रांवर विक्रीचा दबाव राहिला. यामध्ये 'निफ्टी मेटल' निर्देशांक 1.11 टक्केघसरून सर्वाधिक तोट्यात राहिला. तसेच आयटी, एफएमसीजी, मीडिया, रिअल्टी आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.
जागतिक संकेतांमुळे बाजाराला बळ
शेअर बाजारातील या वाढीला जागतिक पातळीवरील दोन प्रमुख घडामोडी कारणीभूत ठरल्या. पहिले म्हणजे, अमेरिकेतील जून महिन्यातील महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आल्याने फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात आक्रमक वाढ करणार नाही, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला. दुसरे म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून जाणाऱ्या जहाजांवर प्रस्तावित केलेले 20 टक्के वाहतूक शुल्क (Transit Tariff) मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांमधील तणाव निवाळला.
याशिवाय, रशियाविरुद्धच्या अमेरिकेच्या संभाव्य निर्बंधांच्या मसुद्यात करण्यात आलेले बदलही भारतासाठी दिलासादायक ठरले. भारत आणि चीनसारख्या देशांवर लादले जाणारे प्रस्तावित शुल्क पूर्वीच्या 500 टक्के वरून कमी करून जास्तीत जास्त 100 टक्के करण्याचा नवा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या नरमाईच्या भूमिकेमुळे भारतीय बाजारातील चिंता बरीच कमी झाली. जागतिक बाजारातील ही सकारात्मकता अशीच कायम राहिल्यास आगामी दिवसांत भारतीय शेअर बाजारात आणखी मजबूती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.