Stock Market Crash: जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सलग 3 सत्रांमध्ये झालेल्या तुफान विक्रीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून, सेन्सेक्स 1,500 अंकांची मोठी घसरण नोंदवत 76,755 ची पातळी गाठली. तर दुसऱ्या बाजूला निफ्टीनेही 24,000 ची महत्त्वाची सीमा ओलांडून 23,996 वर बंद झाला. जागतिक बाजारातील तणाव, कच्च्या तेलाचे भडकलेले भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे बाजारात ही प्रचंड विक्री दिसून आली.
लाल रंगात न्हालेला बाजार; बहुतांश शेअर्स घसरले
बुधवारी बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 715.06 अंकांचा गदारोळ झाला, तर निफ्टीने 191.45 अंकांची घसरण नोंदवली. दिवसभरातील व्यवहारात विक्रीचा दबाव इतका जबरदस्त होता की बाजारातील तब्बल 2,600 पेक्षा जास्त शेअर्स तोट्यात बंद झाले. याउलट केवळ 1,400 च्या आसपास शेअर्समध्येच किंचित तेजी पाहायला मिळाली.
रिअल्टी, बँकिंग अन् आयटी क्षेत्राला सर्वाधिक फटका
या घसरणीचा सर्वाधिक दणका मीडिया आणि रिअल्टी क्षेत्राला बसला. निफ्टी मीडिया इंडेक्स 2.7 टक्के तर रिअल्टी इंडेक्स 2.6 टक्क्यांनी घसरला. याशिवाय पीएसयू बँकांमध्ये 1.8 टक्के, आयटी क्षेत्रात 1.5टक्के आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये 1.4 टक्केची घसरण नोंदवली गेली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली केली. मात्र, या पडझडीच्या काळात एफएमसीजी (FMCG) आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी काही प्रमाणात बाजार सावरण्याचा प्रयत्न केला.
इंडिगो आणि इन्फोसिस तुटले; बजाज ऑटो अन् पॉवर ग्रिड सावरले
घसरण झालेल्या प्रमुख शेअर्समध्ये इंडिगो (InterGlobe Aviation), जिओ फायनान्शियल, इन्फोसिस, एसबीआय (SBI) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांचा समावेश होता. दुसरीकडे, प्रतिकूल परिस्थितीतही बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, पॉवर ग्रिड आणि ओएनजीसी (ONGC) या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली.
बाजार कोसळण्याची 3 मुख्य कारणे:
कच्च्या तेलातील भडका: ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 95 डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भारताच्या आयात खर्चात आणि महागाईत वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होऊन 96.36 च्या पातळीवर आला, ज्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भांडवल काढून घेण्याचा धडाका लावला.
ट्रम्प यांची टॅरिफची घोषणा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर नवीन शुल्क (टॅरिफ) लादण्याचे संकेत दिल्याने सन फार्मा, सिप्ला आणि डॉ. रेड्डीजसारख्या भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.
आगामी काळातील बाजाराची दिशा
कच्च्या तेलाचे दर, भू-राजकीय घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री रोखली जात नाही, तोपर्यंत बाजारात हीच अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत येणारे कंपन्यांचे तिमाही निकाल आणि जागतिक संकेतांवरून बाजाराची पुढील चाल निश्चित होईल.