Spiritual Significance of Planting Tulsi on Akshaya Tritiya : हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी केलेले दान आणि सत्कर्म कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी सत्कर्मे करण्यास प्राधान्य द्यावे. यंदा 19 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या या मुहूर्तावर घरात तुळशीचे रोप लावणे हे भाग्योदय करणारे ठरू शकते. केवळ सोने खरेदीकडे कल न ठेवता, आध्यात्मिक प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी प्रयास नक्की करावेत. या दृष्टिकोनातून तुळशीचे रोपण करणे हे सुख-समृद्धीचे द्वार मानले जाते.
तुळस आणि लक्ष्मीचे अतूट नाते
धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला 'हरिप्रिया' म्हटले जाते, जी भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन तुळशीचे रोप लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (कृपया नवीन रोप लावण्यासाठी आधीच चांगले असलेले हिरवेगार रोप उपटू नये.) ज्या घरात तुळस हिरवीगार आणि प्रसन्न असते, तिथे नकारात्मकता टिकत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 'रामा' (हिरवी पाने) किंवा 'श्यामा' (जांभळट पाने) यांपैकी कोणत्याही तुळशीची निवड करू शकता, कारण दोघांचेही आध्यात्मिक आणि औषधी मूल्य सारखेच आहे.
तुळशी रोपणासाठी शास्त्रोक्त तयारी
या शुभ दिवशी तुळशीचे रोपण करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:
साहित्य: नवीन कुंडी, सुपीक माती, थोडे शेणखत, पाणी, दिवा आणि फुले.
विधी: अक्षय्य तृतीयेला सकाळी लवकर म्हणजेच 'ब्राह्म मुहूर्तावर' उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुळस लावण्याचा संकल्प करावा.
मुहूर्त: 19 एप्रिव रोजी सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 या दरम्यान पूजेचा विशेष मुहूर्त असून या काळात रोप लावणे अधिक फलदायी ठरेल.
तुळस रोपण करण्याचा शास्त्रोक्त विधी
1. नवीन कुंडीमध्ये थोडी ओलसर माती आणि नैसर्गिक शेणखत मिसळून वाफा तयार करा.
2. रोप लावताना मनात "ओम नमो भगवते वासुदेवाय" किंवा भगवान विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करत राहा.
3. मातीमध्ये खड्डा करून तुळशीचे रोप अलगद लावा आणि त्याला पाणी थोडेसे घाला.
4. रोप लावून झाल्यानंतर तुळशीमातेसमोर तुपाचा दिवा लावा.
5. पूजेदरम्यान "ओम श्री तुलसीदेवी नमः" या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
नित्य सेवा आणि स्वच्छतेचे नियम
तुळशीचे रोप लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. तुळशीच्या कुंडीभोवती नेहमी स्वच्छता ठेवावी आणि तिथे चपला किंवा कचरा असू नये, याची दक्षता घ्यावी. दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करून संध्याकाळी तिथे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. अक्षय्य तृतीयेला केलेले हे 'अक्षय्य' कार्य तुमच्या जीवनात स्थैर्य आणि शांती घेऊन येईल.
हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 : सोने खरेदीसाठी 19 तासांचा सुवर्णयोग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ वेळ आणि मुहूर्त
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)