Rohingya Boat Tragedy: बंगालच्या उपसागरात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना; 2 बोटी बुडाल्या; 500 हून अधिक रोहिंग्यांना जलसमाधी

म्यानमारमधील रखाइन राज्यातून निघालेल्या या बोटी खराब हवामानामुळे समुद्रात उलटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Rohingya Boat Tragedy: बंगालच्या उपसागरात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना; 2 बोटी बुडाल्या; 500 हून अधिक रोहिंग्यांना जलसमाधी

Rohingya Boat Tragedy:  म्यानमारच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात निर्वासितांनी भरलेल्या 2 बोटी बुडून 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) संस्थांनी या भीषण दुर्घटनेची माहिती दिली आहे. म्यानमारमधील रखाइन राज्यातून निघालेल्या या बोटी खराब हवामानामुळे समुद्रात उलटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन' (IOM) आणि 'यूएन निर्वासित संस्था' (UNHCR) यांनी या संदर्भात एक संयुक्त निवेदन जारी करून घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

रखाइनमधून निघालेल्या दोन्ही बोटी बेपत्ता; शोधकार्य सुरू

प्राप्त माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्यानमारच्या पश्चिम रखाइन राज्यातून 500 हून अधिक रोहिंग्या निर्वासित 2 बोटींमधून प्रवासासाठी निघाले होते. यातील एका बोटीत सुमारे 250 आणि दुसऱ्या बोटीत अंदाजे 300 लोक स्वार होते. रखाइन सोडल्यानंतर काही वेळातच या दोन्ही बोटींचा संपर्क तुटला आणि त्या बेपत्ता झाल्या. अखेर 8 जुलै रोजी बंगालच्या उपसागरातील अयेयारवाडी (इरावडी) किनारपट्टीजवळ या दोन्ही बोटी बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अद्याप एकही मृतदेह नाही, कोणाचाही ठावठिकाणा लागेना

संयुक्त निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, बेपत्ता झालेल्या 500 हून अधिक व्यक्तींपैकी कोणाचाही अद्याप शोध लागलेला नाही. समुद्रातून एकही मृतदेह बाहेर काढता आलेला नाही आणि कोणी जिवंत वाचल्याचे वृत्तही नाही. साधारणपणे रोहिंग्या समुदाय पावसाळ्यातील धोकादायक हवामान आणि समुद्रातील उंच लाटांमुळे या दिवसांत प्रवास करणे टाळतो, मात्र तरीही हा प्रवास करण्यात आला होता.

हेही वाचा – Dhurbe Elephant: बदला घेणारा 'धुरबे' हत्ती? चौदा वर्षांनंतर त्याच कुटुंबाचा माग काढत आणखी दोघांना चिरडले

म्यानमारमधील हिंसाचारामुळे जीव धोक्यात घालून पलायन

म्यानमारमध्ये सातत्याने सुरू असलेला हिंसाचार आणि बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधील बिकट परिस्थितीमुळे रोहिंग्या नागरिक मोठ्या प्रमाणावर पलायन करत आहेत. या छावण्यांमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने तेथील राहणीमान अवघड झाले आहे. याच कारणास्तव मलेशिया, इंडोनेशिया किंवा थायलंडमध्ये जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्याच्या आशेने हे निर्वासित जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. मात्र, गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर हा काळाने झडप घातली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number