US Iran War: मध्यपूर्वेतील शांतता चर्चा पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेली शांतता फार काळ टिकू शकली नाही. इराणने ‘M/T Kiku’ या तेलवाहू जहाजावर केलेल्या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या नौदल आणि हवाई दलाने शनिवारी रात्री उशिरा मोठी लष्करी कारवाई केली. अमेरिकन लढाऊ विमानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या एकूण 10 लष्करी तळांना लक्ष्य केले. यामध्ये इराणचे किनारी रडार केंद्र, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन साठवणूक सुविधांचा प्रामुख्याने समावेश होता. यू.एस. सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.
‘इराणचे अस्तित्व संपुष्टात येईल’; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा कडक इशारा
या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत इराणला कडक शब्दांत सुनावले आहे. इराणकडून वारंवार शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ट्रम्प म्हणाले की, इराण कदाचित आपल्या चुकांमधून कधीच शिकणार नाही. जर परिस्थिती अशीच राहिली, तर अमेरिकेला अधिक आक्रमक लष्करी पावले उचलावी लागतील आणि सुरु केलेले काम लष्करी मार्गानेच पूर्ण करावे लागेल. असे झाल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्वच नष्ट होऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – Gaza Israel Conflict: गाझात बालकांचा नरसंहार; 20,000 मुलं मारली; इस्रायली लष्कराचा क्रूर चेहरा समोर
बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्रे
अमेरिकेच्या या धडक कारवाईमुळे संतप्त झालेल्या इराणनेही तात्काळ मोठा प्रतिहल्ला चढवला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) बहरीन आणि कुवेतमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या एकूण 8 लष्करी तळांवर थेट हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधील ‘अली अल सालेम’ हवाई तळ आणि बहरीनमधील अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘5व्या नौदला’च्या (5th Fleet) केंद्राला प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले.
U.S. Navy and Air Force fighter jets conducted strikes tonight on 10 Iranian military targets at multiple locations in and near the Strait of Hormuz for Iran's drone attack on M/T Kiku. pic.twitter.com/Z0TLZRqmF6 — U.S. Central Command (@CENTCOM) June 28, 2026
कुवेतमध्ये हाय-अलर्ट; हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय
इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केल्यामुळेच आता शांतता कराराला धोका निर्माण झाल्याचा आरोप इराणने केला आहे. दरम्यान, इराणकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कुवेत कमालीचे सतर्क झाले आहे. कुवेती लष्कराने देशाच्या सुरक्षेसाठी आपली हवाई संरक्षण प्रणाली (Air Defence System) पूर्णपणे सक्रिय केली असून संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.