Sonbhadra Mining Accident: उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात दगड खाण कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेले बचावकार्य अखेर पूर्ण झाले आहे. सलग तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण सात मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिली. सोनभद्रचे पोलिस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची 100 टक्के पडताळणी झाल्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. त्यांनी पुढे म्हटले, दगड खूप मोठ्या आकाराचा असल्याने हे अत्यंत कठीण ऑपरेशन होते. आम्ही एक पर्यायी मार्ग तयार केला आणि सर्व पथकांच्या सहकार्याने मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
कुटुंबियांना मृतदेह सुपूर्द
दरम्यान, सोनभद्रचे जिल्हाधिकारी चंद्र विजय सिंह यांनी सांगितले की, सर्व 7 मृतदेहांची ओळख पटली आहे. तसेच शवविच्छेदन पूर्ण झाले असून मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या पथकाच्या अहवालानुसार, खाणीत आणखी कोणत्याही व्यक्तीचा जीवित अथवा मृत स्वरूपात असण्याची शक्यता नाही.
दुर्घटना कशी घडली?
खाणीचा एक भाग अचानक कोसळल्याने अंदाजे 15कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेनंतर लगेचच एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासनाचे पथक यांना तातडीने बचावासाठी तैनात करण्यात आले. जड यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने ढिगारा हटवणे सुरू होते. मोठे दगड मार्गात आडवे येत असल्यामुळे पथकाने एक पर्यायी मार्ग निर्माण करून मोहिम राबवली.
कंपनी मालकावर गुन्हा दाखल
पीडित कुटुंबांच्या तक्रारीनंतर कंपनी मालक आणि संबंधित इतर व्यक्ती यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तथापी, या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.