HC On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातच उपचार घेणार; उच्च न्यायालयाकडून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश

वांगचुक यांच्यावर सध्या सुरू असलेल्या सफदरजंग रुग्णालयातच वैद्यकीय उपचार सुरू राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

HC On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातच उपचार घेणार; उच्च न्यायालयाकडून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश

HC On Sonam Wangchuk: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या कुटुंबीयांची विनंती दिल्ली उच्च न्यायालयाने सध्यातरी अमान्य केली आहे. वांगचुक यांच्यावर सध्या सुरू असलेल्या सफदरजंग रुग्णालयातच वैद्यकीय उपचार सुरू राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, त्यांना दिलासा देत न्यायालयाने त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात भेटण्याची मुभा दिली असून, कुटुंबीयांच्या सुविधेसाठी रुग्णालयात स्वतंत्र विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून, पुढील 3 दिवसांत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.

पत्नी गीतांजली अंगमो यांच्या याचिकेवर अंतरिम दिलासा नाही

न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रशासनाचा निर्णय कायदेशीर चौकटीतच होता. यामुळे न्यायालयाने या टप्प्यावर कोणताही अंतरिम आदेश जारी करण्यास नकार दिला. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी पतीला 'मेदांता' या खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना कोणताही अंतरिम दिलासा मिळाला नाही. परिणामी, न्यायालयाच्या या भूमिकेमुळे वांगचुक यांना तूर्तास सफदरजंग रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

रुग्णाची काळजी सर्वोच्च प्राथमिकता: उच्च न्यायालय

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, प्रत्येक व्यक्तीचा जीव अत्यंत मौल्यवान असून रुग्णाची योग्य काळजी घेणे ही प्रशासनाची पहिली जबाबदारी आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार, वांगचुक यांच्या पत्नी आणि भावाला त्यांच्यासोबत 24 तास राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयाने त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली असून, त्यांना वांगचुक यांच्याशी संवाद साधता येत असल्याचे न्यायालयाने मान्य केले. यासोबतच, त्यांच्या कुटुंबाला स्वतंत्र प्रसाधनगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देश देत न्यायालयाने वांगचुक यांना भेटण्यास पूर्ण मुभा दिली आहे. आता सर्वांचे लक्ष 24 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.

खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी कुटुंबीयांचा आग्रह

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सफदरजंग रुग्णालयाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. रुग्णालयाकडून केवळ निवडक माहिती दिली जात असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनावरील विश्वास उडाल्याचे सांगितले. वांगचुक यांची प्रकृती अधिक खालावण्यापूर्वी त्यांना स्वतःच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास नकार दिल्याने त्यांच्या आरोग्याची स्वतंत्र डॉक्टरांकडून पडताळणी करणे अशक्य झाल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. आंदोलनाच्या ठिकाणाहून आणताना त्यांचे सर्व शारीरिक संकेत स्थिर होते, मग आता उपचार प्रक्रियेत इतकी गुप्तता आणि अपारदर्शकता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Sonam Wangchuk: 'ही भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असेल', रुग्णालयातून पत्नीमार्फत संदेत देत सोनम वांगचुक यांचा संसदेवरील मोर्चाचा एल्गार!

उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांची कारवाई

नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शनिवारी त्यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस असताना, दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून बळजबरीने ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या बळजबरीच्या भूमिकेला जंतर-मंतरवरील इतर आंदोलकांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number