Sonam Wangchuk New Video: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देत तब्बल 26 दिवस उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 18 जुलै रोजी मला जबरदस्तीने जंतर-मंतरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असा दावा करत त्यांनी तिथल्या वातावरणाची तुलना तुरुंगाशी केली. ‘मला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे छावणीत आणि कैद्यांसारखे बंदिस्त ठेवण्यात आले होते. बाहेर कोणाला भेटण्याची परवानगी नव्हती, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू दिला जात नव्हता, अगदी नॅपकीनवर लिहिलेले मेसेजही जप्त केले जात होते; हे पूर्णपणे नॉर्थ कोरियासारखे चित्र बनले होते,’ असा थेट घणाघात त्यांनी केला.
‘डील’च्या आरोपांवर सोनम वांगचुक यांचे जोरदार प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषण सोडल्यामुळे वांगचुक यांच्यावर सरकारसोबत ‘डील’ केल्याचे आरोप काही वर्गांतून केले जात होते. या संशयखोरांचा समाचार घेताना वांगचुक म्हणाले, ‘मी 26 दिवस उपाशी राहिलो, दिल्लीच्या तीव्र उकाड्यात सोसले आणि माझे 11 किलो वजन घटले; अवयव आणि मेंदूवर परिणाम होण्याचा धोका असताना मी 26 दिवस भूक सोसली आहे. जर मला सरकारसोबत एखादी डील करायची असती, तर ती मी दिल्लीच्या उकाड्यात उपाशी राहून केली नसती, तर वातानुकूलित (AC) खोलीत आरामात बसून केली असती.’ अशा प्रकारे उपोषणाच्या पवित्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कोणाकडूनही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
सर्वपक्षीय वातावरणात उपोषण सोडण्याची होती इच्छा
उपोषण मागे घेण्यामागची पार्श्वभूमी सांगताना वांगचुक यांनी स्पष्ट केले की, मला अशा प्रकारे रुग्णालयात उपोषण सोडायचे नव्हते. सीजेपीचे नेते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सर्व आंदोलकांच्या उपस्थितीत मला जाहीरपणे उपोषण सोडायचे होते. परंतु, दिल्लीमध्ये आंदोलनावरून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते आणि काहीतरी मोठी दुर्घटना घडू शकते, असा धोका निर्माण झाला होता. आंदोलनाला कोणतेही हिंसक वळण लागू नये आणि देशहिताचा विचार करून मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे हीच सर्वात मोठी प्राथमिकता
आपल्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला नाही तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक नुकसान होणार नाही, पण आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर त्यांचे संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त होते. लडाखमध्ये एका एफआयआरमुळे तरुणांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे मी पाहिले आहे. त्यामुळेच, 20 जुलैनंतर शांततेत आंदोलन करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर किंवा तरुणावर पोलीस केस दाखल केली जाणार नाही आणि नीट प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई दिली जाईल, हे लेखी/सकारात्मक आश्वासन सरकारकडून मिळवणे ही माझी मुख्य प्राथमिकता होती, असे वांगचुक यांनी शेवटी स्पष्ट केले.
हेही वाचा – CJP Protest Continues : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरूच; बाकी दोन मागण्यांसाठी लढण्याचा तरुणांचा निर्धार