Sonali Raut on Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी 6’ चा महाअंतिम सोहळा जवळ आलेला असतानाच, सुरुवातीलाच बाहेर पडलेली स्पर्धक आणि प्रसिद्ध मॉडेल सोनाली राऊतने शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिने घराबाहेरील ग्लॅमर आणि घरातील अस्वच्छता यातील फरक उघड केला. तिने सांगितले की, “रिॲलिटी शो म्हणजे जीवाशी खेळणे नसावे.” घरामध्ये मानवी मर्यादांपलीकडे जाऊन काम करावे लागल्याने आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणामुळे तिला ‘स्केबीज’ (Scabies) हा गंभीर त्वचारोग झाला असून आता आरोग्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरात उंदीर आणि अन्नामध्ये झुरळं
सोनालीने घरातील स्वयंपाकघराबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. तिच्या दाव्यानुसार, किचनमध्ये उंदीर फिरत होते आणि ते स्पर्धकांचे अन्न खात असत. इतकेच नाही तर जेवणातून अनेकदा झुरळं बाहेर येत असत आणि तेच अन्न सर्वांना खावे लागायचे. सुरुवातीला जेव्हा घरात 17 सदस्य होते, तेव्हा त्यांच्यासाठी केवळ 1 बाथरूम उपलब्ध करून देण्यात आले होते. या बाथरूममध्ये मृत उंदीर, अंड्यांची टरफलं आणि कचरा पडलेला असायचा, ज्यामुळे तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आणि दुर्गंधीयुक्त होती.
मूळ सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक वस्तूंची देवाणघेवाण
सोनालीने पुढे असा आरोप केला की, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील स्पर्धकांना संघर्ष करावा लागत असे. 17 स्पर्धकांसाठी मर्यादित टूथब्रश आणि रेझर देण्यात आले होते. टॉवेल, नॅपकिन आणि अगदी बेडशीट सुद्धा एकमेकांचे वापरावे लागत, ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. झोप पूर्ण न होणे आणि पुरेसे अन्न न मिळणे यांसारख्या समस्यांनी ती त्रस्त होती. करियरसाठी कुणालाही आरोग्याशी तडजोड करण्याची वेळ येऊ नये, असे म्हणत तिने आपल्या तक्रारीचा पाढा वाचला आहे.
धूम्रपान आणि अस्वच्छतेने भरलेले बाथरूम
बाथरूममध्ये लोक धूम्रपान करत असत आणि तिथेच चिकन, अंडी आणि इतर कचरा टाकलेला असायचा, असे सोनालीने नमूद केले. मोठ्या विश्वासाने या घरात प्रवेश केला होता, मात्र तिथे मिळणारी वागणूक अत्यंत अमानवीय होती. शोच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच ‘टॉप 5’ सदस्य निवडले गेले असताना सोनालीने केलेल्या या आरोपांमुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर प्रोडक्शन टीम आणि कलर्स मराठी चॅनेल काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.