Venezuela Ship Death : व्हेनेझुएलाच्या समुद्रात संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेल्या राकेश चौहान या भारतीय खलाशाचा मृतदेह तब्बल एका महिन्यानंतर मायदेशी परतला आहे. मात्र, मृतदेह घरी पोहोचताच एक अत्यंत अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने राकेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असला, तरी भारतात त्याच्या मृतदेहाची जी अवस्था पाहायला मिळाली, त्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. राकेशचे केवळ डोके आणि संपूर्ण शरीरावर असंख्य टाके मारलेले धडच भारतात पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
मर्चंट नेव्हीतील नोकरी आणि एका महिन्यातच घात
उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील लगडा बाजार येथील रहिवासी असलेला राकेश नोव्हेंबर 2025 मध्ये मर्चंट नेव्हीच्या जहाजावर नोकरीसाठी व्हेनेझुएलाला गेला होता. 'एक्सफिनिटी' नावाच्या कंपनीमार्फत तो तिथे रुजू झाला होता. परंतु, काही दिवसांतच कंपनीने राकेशचा मृत्यू झाल्याचा निरोप त्याच्या कुटुंबीयांना दिला. व्हेनेझुएला प्रशासन आणि कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात राकेशचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आला आणि 4 जून रोजी तो देवरिया येथे त्याच्या गावी पाठवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहासोबत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणारी कोणतीही अधिकृत कागदपत्रे देण्यात आली नव्हती.
भारतीय डॉक्टरांच्या पुनरावृत्ती तपासात धक्कादायक सत्य उघड
परदेशातून आलेल्या कागदपत्रांविषयी संशय आल्याने कुटुंबीयांनी भारतात पुन्हा एकदा राकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. या दुसऱ्या तपासणीत जे सत्य समोर आले ते अत्यंत थरकाप उडवणारे होते. वैद्यकीय अहवालानुसार, राकेशच्या शरीरातील एकही मुख्य अवयव शिल्लक नव्हता. त्याचे दोन्ही फुफ्फुसे, हृदय, यकृत (Liver), मेंदू, दोन्ही मूत्रपिंडे (Kidneys), स्वादुपिंड (Pancreas), पोट आणि आतडे पूर्णपणे गायब होते. एवढेच नव्हे तर गळ्यातील थायरॉईड, स्वरयंत्र आणि श्वासनलिका देखील काढून घेण्यात आली होती. संपूर्ण मृतदेहावर डोक्यापासून गळ्यापर्यंत आणि छातीपासून पोटापर्यंत केवळ टाक्यांचे जाळे होते. शरीरात अवयवच शिल्लक नसल्यामुळे भारतीय डॉक्टरांना आता त्याच्या मृत्यूचे खरे कारण शोधणे अशक्य झाले आहे.
अवयव तस्करीचा संशय; पीडित कुटुंबाची न्यायासाठी आर्त हाक
दरम्यान, राकेशच्या वडिलांनी संबंधित कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीने केवळ कागदोपत्री बनाव करून हृदयविकाराचा खोटा दावा केला असून मूळ सत्य लपवण्यासाठीच हे सर्व केले गेल्याचा त्यांचा आरोप आहे. सामान्यतः कोणत्याही गूढ मृत्यूच्या चौकशीसाठी शवविच्छेदनादरम्यान अवयवांचे छोटे नमुने (Visceral samples) तपासणीसाठी ठेवले जातात, परंतु राकेशच्या बाबतीत संपूर्ण अवयवच गायब झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय अवयव तस्करीचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात आता भारत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, व्हेनेझुएला सरकारकडे याची उच्चस्तरीय चौकशी लावून धरावी आणि पीडित कुटुंबाला योग्य न्याय व भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.