Snake Bite Insurance : पावसाळ्याच्या दिवसांत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे साप राहण्याची बिळे सोडून सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडतात. अशा वेळी साप अनेकदा घराचे कोपरे, कुंडी, वाहने, बूट किंवा हेल्मेटमध्ये लपून बसतात आणि नकळत माणसाचा सामना झाल्यावर घाबरून दंश करतात. सर्पदंश झाल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या सरकारी रुग्णालयात अँटी-व्हेनम औषध मोफत उपलब्ध असते. मात्र, आपात्कालीन परिस्थितीत वेळेवर सरकारी दवाखान्यात पोहोचणे शक्य न झाल्यास रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा वेळी उपचाराचा खर्च मोठा असतो, जसे की अमेरिकेत एका व्यक्तीला 2 वेळा साप चावल्यानंतर 54 अँटी-व्हेनम डोस द्यावे लागले होते आणि त्याचा खर्च तब्बल 11 कोटी रुपये झाला होता.
हेल्थ इन्श्युरन्स आणि मेडिक्लेमचा फायदा
भारतात साप चावल्यास हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून मेडिक्लेम मिळतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचे उत्तर 'होय' असे आहे. मात्र, याबाबतचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बहुतेक सर्वच आरोग्य विमा कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये 'पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरेज'चा (Personal Accident Coverage) समावेश असतो, जो सामान्य आजारांच्या कव्हरपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. या कव्हरेजसाठी सहसा कोणताही वेटिंग पिरेड (Waiting Period) लागू नसतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास, अँटी-व्हेनम इंजेक्शन्स, औषधोपचार आणि अगदी आयसीयू (ICU) मधील उपचारांचा खर्च हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून मंजूर केला जातो.
साप चावून मृत्यू झाल्यास विम्याचे काय?
आरोग्य विम्या व्यतिरिक्त जर सर्पदंशामुळे रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर विमा कंपन्या 'पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर' अंतर्गत विम्याची पूर्ण रक्कम वारसाला देतात. सामान्य जीवन विमा (Life Insurance) पॉलिसींमध्ये आजारांच्या कव्हरसोबत अपघाती मृत्यूचे कव्हरेज समाविष्ट असते. याशिवाय टर्म इन्श्युरन्स (Term Insurance) घेणाऱ्या व्यक्तीलाही सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास विम्याच्या संरक्षणाचा पूर्ण लाभ दिला जातो.
हेही वाचा – Farm Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेपूर्वी खात्यात थेट जमा होणार कर्जमाफीचे पैसे
टर्म इन्श्युरन्स क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे
टर्म इन्श्युरन्समध्ये दावा (Term Insurance Claim) मंजूर करण्यासाठी काही तांत्रिक आणि कायदेशीर अटींची पूर्तता करावी लागते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण सर्पदंश असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी काही वेळेस शरीरावर सापाच्या दंशाची स्पष्ट खूण (Bite Marks) दिसत नाही तोपर्यंत कंपन्या दावा रोखून ठेवू शकतात. यासाठी खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे:
पोलीस एफआयआर (FIR Copy): घटनेची अधिकृत नोंद.
वैद्यकीय अहवाल (Doctor's Report): डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचा सविस्तर अहवाल.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट: मृत्यूचे मुख्य कारण दर्शवणारा अहवाल.
योग्य वेळेत क्लेम करणे गरजेचे
सर्पदंशाच्या घटनेनंतर विमा क्लेम करताना योग्य कागदपत्रांची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच पोलीस स्टेशनला दिलेली माहिती आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र विमा दावा मंजूर होण्यासाठी मुख्य पुरावे ठरतात. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचारांसोबत विमा पॉलिसीच्या नियमांची माहिती ठेवून दाव्याची प्रक्रिया पूर्ण करावी.