IndiGo Flight Emergency Landing: दुबईहून मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्या विमानातील सामान ठेवण्याच्या (कार्गो) भागात अचानक धूर आल्याने सोमवारी हवेतच प्रचंड घबराट पसरली. धोक्याचा इशारा मिळताच वैमानिकाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सतर्क करून विमानाची दिशा राजकोटकडे वळवली. दुपारी 2:45 वाजता धोक्याची सूचना मिळण्यापासून ते दुपारी 3:27 वाजता विमान राजकोट विमानतळावर सुरक्षित उतरेपर्यंतच्या तब्बल 42 मिनिटांत विमानावरील 194 प्रवाशांनी अनिश्चिततेचा आणि तीव्र तणावाचा सामना केला. सुदैवाने सर्व प्रवाशांना कोणतीही इजा न होता बाहेर काढण्यात आले. दरम्यान, कार्गो विभागात धूर येण्यामागचे मूळ कारण शोधण्यासाठी तपास पथके कार्यरत झाली आहेत.
राजकोट विमानतळावर हाय अलर्ट; अग्निशामक दल सज्ज
राजकोट विमानतळाचे संचालक दिगंत बोरा यांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन व्यवस्थेची माहिती दिली. दुबई-मुंबई इंडिगो फ्लाइट (एअरबस A321, क्रमांक IGO1452) मधील धुराच्या समस्येनंतर विमानतळावर पूर्ण आपत्कालीन स्थिती (Full Emergency) घोषित करण्यात आली होती. धावपट्टीवर पोलीस ताफा आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी 3:27 वाजता हिरासर विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उल्लेखनीय म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरूमध्येही इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी देणारी चिठ्ठी आढळली होती, जी नंतर अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
काठमांडूऐवजी चायना सदर्नचे विमान लखनौत
दुसऱ्या एका घटनेत, चीनमधील ग्वांगझू येथून काठमांडूसाठी उड्डाण केलेल्या चायना सदर्न एअरलाईन्सच्या विमानाला (CZ 3067, एअरबस A320neo) प्रतिकूल हवामानामुळे मार्ग बदलावा लागला. काठमांडूमध्ये उतरणे शक्य नसल्याने हे विमान रविवारी रात्री 11:18 वाजता लखनौ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. या विमानातील सर्व 159 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली आहे.