Naxalite Encounter: माओवादी कमांडर माडवी हिडमाचा खात्मा झाल्यानंतर केवळ एका दिवसात सुरक्षा दलांना नक्षलविरोधी लढाईत आणखी मोठे यश मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू (ASR) जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात बुधवारी झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
सात माओवाद्यांचा खात्मा
आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) महेश चंद्र लड्ढा यांनी विजयवाड्यात पत्रकार परिषद घेऊन चकमकीचे तपशील सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, मंगळवारी झालेल्या हिडमा ऑपरेशनच्या पुढील टप्प्यात हे यश मिळाले. लड्ढा म्हणाले, आतापर्यंत सात माओवादी ठार झाल्याची माहिती आहे. त्यात तीन महिला उग्रवाद्यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत, मृत्यू झालेल्यांपैकी एकाची ओळख श्रीकाकुलम येथील मेतुरी जोखा राव उर्फ ‘टेक’ शंकर अशी झाली आहे. शंकर हा AOB (Andhra-Odisha Border) क्षेत्रातील एरिया कमिटी मेंबर होता आणि तांत्रिक उपकरणे, शस्त्रनिर्मिती व कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये तो तज्ज्ञ मानला जात होता.
स्फोटक साहित्य जप्त
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवसांच्या कारवाईत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. तथापी, 45 शस्त्रे, 272 गोळ्या, दोन मॅगझिन, 750 ग्रॅम वायर आणि इतर अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, अलिकडच्या काही दिवसांतील विशेष ऑपरेशनमध्ये एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनासीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून 50 माओवादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, ही आंध्र प्रदेशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
छत्तीसगड-आंध्र सीमेलगतच्या हालचालींवर सतत लक्ष
अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरक्षा दल छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवून आहेत. त्यांची संभाव्य उपस्थिती, लपण्याची ठिकाणे व हालचालींबाबत मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे मारेदुमिल्लीमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली. या ऑपरेशनबाबत आणखी माहिती लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.