Rumani Khare Wedding: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी नव्या आयुष्याची सुरुवात करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अशातच आता मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार आणि गायक संदीप खरे यांच्या कुटुंबातही आनंदाचा सोहळा पार पडला आहे. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री रुमानी खरे हिने अभिनेता स्तवन शिंदे याच्यासोबत विवाहबंधनात अडकत आयुष्याची नवी वाट सुरू केली आहे.रुमानी आणि स्तवन यांच्या लग्नाची बातमी समोर येताच मराठी कलाविश्वात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मित्रमंडळी, कुटुंबीय आणि जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचं समोर आलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच रुमानी आणि स्तवन यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत साखरपुडा केला होता. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला होता. त्यानंतर आता या दोघांनी लग्न करत त्यांच्या नात्याला नवं रूप दिलं आहे. 8 मार्च रोजी पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.लग्नातील काही सुंदर क्षण स्तवन शिंदेने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत. चाहत्यांनीही या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देत नवदाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांच्या जोडीचं कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नासाठी रुमानी खरेने पारंपरिक लूक निवडला होता. हिरव्या रंगाची सुंदर साडी, साधा पण आकर्षक मेकअप आणि पारंपरिक दागिन्यांमुळे ती खूपच देखणी दिसत होती. तर स्तवन शिंदेने सूट परिधान केला होता. त्याने डोक्यावर फेटा बांधल्यामुळे त्याचा लूक अधिकच उठून दिसत होता. या दोघांच्या पारंपरिक वेशभूषेने लग्नसोहळ्याची शोभा वाढवली. अभिनय क्षेत्रात रुमानी खरेने मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘दुर्गा’ या मालिकेतही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे.
दुसरीकडे स्तवन शिंदेही मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्याने काम करत आपली छाप पाडली आहे. आता या दोघांनी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या आयुष्यासाठी चाहत्यांकडून आणि मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नव्या आयुष्यातही ही जोडी आनंदी आणि यशस्वी राहो, अशीच इच्छा सर्वजण व्यक्त करत आहेत.