Salman Khan On Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ‘बिग बॉस 19’च्या सेटवरही त्याचे तीव्र पडसाद दिसून आले. शोचा होस्ट सलमान खान धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगताना भावुक झाला आणि कॅमेऱ्यासमोरच त्याचे अश्रू अनावर झाले. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर फिल्म इंडस्ट्री, चाहत्यांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत सर्वत्र दुःखाची लाट पसरली आहे.
अलीकडील एका एपिसोडमध्ये सलमान खानने शोच्या सुरुवातीलाच धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. “हा संपूर्ण आठवडा प्रार्थना आणि अश्रूंनी गेला. देशाला, चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे,” असे सांगताना त्याचा आवाज दाटून आला. सलमानने पुढे सांगितले, “तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. प्रामाणिकपणे सांगतो… मला या आठवड्यात 'वीकेंड का वार' करायचा नव्हता.” ही वाक्ये उच्चारताना सलमान खानच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दुःख दिसत होते.
सलमान खान आणि धर्मेंद्र यांच्यातील नातं हे बॉलिवूडमध्ये सर्वश्रुत आहे. केवळ सिनेमांच्या पलीकडे जाऊन हे नाते प्रेम आणि आदराने जपले गेले. धर्मेंद्र अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सलमान खानला “माझा तिसरा मुलगा” अशा शब्दांत संबोधत. ‘दस का दम’च्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी सलमानसोबतच्या त्यांच्या नात्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. तेव्हा धर्मेंद्र यांनी सलमानच्या सवयी, त्याची मनमिळाऊ वृत्ती यांचा उल्लेख करत त्याच्यावरील आपुलकी जाहीरपणे व्यक्त केली होती.
सलमान खानदेखील अनेक मुलाखतीत धर्मेंद्रप्रति असलेलं विशेष प्रेम व्यक्त करत आला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर शोकसंवेदना व्यक्त केल्या. “ही एक पोकळी आहे जी कधी भरून निघणार नाही,” अशा भावना व्यक्त करत अनेकांनी या महान कलाकाराला अंतिम निरोप दिला.