Big Boss Marathi Season 6 : प्रेक्षकांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली असून 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर आज, 11 जानेवारी 2026 रोजी पार पडत आहे. यंदाच्या पर्वाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे 'बिग बॉस'चे आलिशान घर. "दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार" ही यावेळची थीम असून घराची रचनाही त्याच कल्पकतेने करण्यात आली आहे. तब्बल 800 खिडक्या आणि 900 दारांनी सजलेले हे घर एखाद्या चक्रव्यूहासारखे भासते, जिथे प्रत्येक पाऊल स्पर्धकांचे भविष्य बदलू शकते. प्रसिद्ध कलादिग्दर्शक उमंग कुमार यांनी केवळ 45 दिवसांत AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे भव्य घर साकारले आहे.
आलिशान बेडरुम आणि 'रॉयल' कॅप्टन रुम
घरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते ती म्हणजे येथील बेडरुम. अतिशय हटके आणि आधुनिक शैलीत डिझाइन केलेली ही बेडरुम स्पर्धकांसाठी आरामदायी असली तरी, इथे होणाऱ्या गॉसिपमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा 'बंक बेड'ची सुविधा पहिल्यांदाच करण्यात आली असून, त्यावरून वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. घराची 'कॅप्टन रुम' वाइन कलरच्या थीममध्ये रंगवण्यात आली असून तिला अत्यंत 'रॉयल' लूक देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, एक गुपित छोटी गुलाबी खोली देखील आहे, जिथे स्पर्धकांचे गुप्त प्लॅन्स शिजताना दिसतील.
विशाल लिव्हिंग एरिया आणि 'रितेश भाऊ'ची शाळा
घराचा लिव्हिंग एरिया यंदा प्रचंड मोठा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वीकेंडला याच ठिकाणी बसून सुपरस्टार रितेश देशमुख स्पर्धकांची 'शाळा' घेताना दिसणार आहेत. लिव्हिंग एरियाची भिंत आकर्षक नक्षीकाम आणि सुंदर रंगांनी सजवण्यात आली आहे. या भागात बसूनच स्पर्धक 'बिग बॉस'च्या आदेशाची वाट पाहतील. बाथरुम एरियाची रचना देखील यंदा आगळीवेगळी असून त्याला एखाद्या 'बॉयलर रुम'सारखा इंडस्ट्रियल लूक देण्यात आला आहे, जिथे स्पर्धकांचे प्लॅनिंग आणि राडा पाहायला मिळू शकतो.
किचन आणि डायनिंगचा खास कोपरा
'बिग बॉस'च्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे किचन. यावर्षी किचनमध्ये प्रत्येक स्पर्धकासाठी एक 'स्पेशल कॉफी मग' ठेवण्यात आला आहे. याच किचनमध्ये जेवणावरून होणारी भांडणे आणि गेम प्लॅनचा खेळ रंगणार आहे. किचनच्या बाजूलाच एक मोठी डायनिंग रुम आहे, जिथे सर्व स्पर्धक एकत्र बसून चर्चा करू शकतील. घराचा गार्डन एरिया देखील तितकाच देखणा असून तिथे स्विमिंग पूल, भरपूर आरसे आणि स्पर्धकांसाठी बसायला खास सोफे ठेवण्यात आले आहेत.
100 कॅमेरे आणि 100 दिवसांचा थरार
आता हे सर्व स्पर्धक 100 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत पुढील 100 दिवस राहणार आहेत. यंदाच्या घरात दारे आणि खिडक्यांची संख्या अधिक असल्याने, कोणते दार नशिबाचे कुलूप उघडणार आणि कोणते दार अडचणीत टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 13,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेल्या या घरामध्ये आजपासून मनोरंजनाचा महासंग्राम सुरू होणार आहे. कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता हा खेळ प्रेक्षकांना अनुभवता येईल.
हेही वाचा – Suresh Wadkar: ‘माधुरी खूप बारीक असल्याने…’ माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांचं लग्न का झालं नाही?