Iran Crisis : इराणमध्ये आर्थिक चणचण आणि गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सुरू असलेल्या जनआंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेला हा भडका आता देशातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरला असून, सुरक्षा दले आणि आंदोलक यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 8 मुलांसह 45 जणांचा बळी गेला आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, सरकारने राजधानी तेहरानचे विमानतळ बंद केले असून देशभर इंटरनेट आणि फोन सेवा खंडित केली आहे.
'खामेनीचा अंत' आणि राजेशाहीच्या परतण्याच्या घोषणा
आंदोलकांनी रस्त्यावर उतरून केवळ महागाईचाच निषेध केला नाही, तर "खमेनीचा मृत्यू" आणि "इस्लामिक रिपब्लिकचा अंत" अशा थेट घोषणा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी आंदोलकांनी 1979 च्या क्रांतीपूर्वीच्या राजेशाहीचे समर्थन करत निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या नावाचा जयघोष केला. "ही शेवटची लढाई आहे, शाह परत येतील," अशा घोषणांनी इराणचे रस्ते दुमदुमून गेले आहेत.
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
इराणमधील या हिंसक कारवाईवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक भूमिका घेतली आहे. "जर इराण सरकारने निदर्शकांची कत्तल सुरू केली, तर अमेरिका त्यांना अत्यंत जोरदारपणे लक्ष्य करेल," अशी उघड धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. निर्वासित प्रिन्स रझा पहलवी यांनीही अमेरिकेतील आपल्या वास्तव्यावरून इराणी जनतेला लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. इराणमधील या संतापाचे मुख्य कारण कोसळलेली अर्थव्यवस्था आहे. इराणी 'रियाल' इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला असून, एका डॉलरची किंमत 14.5 लाख रियाल झाली आहे. तसेच अन्नधान्याचे भाव 72 टक्के तर औषधांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सरकारने नव्या अर्थसंकल्पात करांमध्ये 62 टक्के वाढ प्रस्तावित केल्याने सामान्य जनतेचा संयम सुटला आहे.
हेही वाचा – Missing Ship : 600 वर्ष जुनं जहाज, उंची दुमजली इमारती इतकी, त्यात असं काही सापडलं की…
47 वर्षांनंतर बदलाची लाट
इराणमधील तरुण पिढी आता 37 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अयातुल्ला अली खामेनी यांच्या धार्मिक राजवटीला कंटाळली आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध, बेरोजगारी आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावरील गदा यामुळे त्रस्त असलेले नागरिक आता 65 वर्षीय रझा पहलवी यांच्याकडे एक 'लोकशाही पर्याय' म्हणून पाहत आहेत. इराणचे लष्कर सध्या हाय अलर्टवर असून, येणारे काही दिवस या देशाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.