Retail Inflation in India : देशातील सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 13 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2026 मध्ये किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) वाढून 3.4 टक्के वर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा दर 3.2 टक्के इतका नोंदवला गेला होता. दिलासादायक बाब म्हणजे, महागाईचा हा आकडा अजूनही 4 टक्क्यांच्या मर्यादेखाली आहे, परंतु खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींनी चिंतेत भर घातली आहे.
13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमती आणि ग्रामीण भागातील स्थिती
– मार्च महिन्यात खाद्य महागाईचा दर 3.87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील महिन्यात 3.47 टक्के होता. विशेष म्हणजे शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाईचा दबाव अधिक दिसून येत आहे.
– ग्रामीण भागात खाद्य महागाई 3.96 टक्के नोंदवली गेली.
– शहरी भागात हाच दर 3.71 टक्के इतका होता.
– एकूण किरकोळ महागाईचा विचार केल्यास गावांमध्ये 3.63 टक्के तर शहरांमध्ये 3.11 टक्के महागाई राहिली आहे.
कोणत्या वस्तू महागल्या आणि कोणत्या स्वस्त?
महागाईच्या या लाटेत काही क्षेत्रांमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे, तर काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे.
-सर्वात जास्त वाढ: चांदीच्या दागिन्यांमध्ये 148.61 टक्के आणि सोने-हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये 45.92 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे.
– भाजीपाला: टोमॅटो 35.99 टक्के आणि फुलकोबी 34.11 टक्क्यांनी महाग झाले आहेत.
– दिलासा: कांदा 27.76 टक्के तर बटाटा 18.98 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. तसेच तूर डाळ 9.56 टक्क्यांने स्वस्त झाली आहे.
– इतर: पर्सनल केअर आणि सोशल प्रोटेक्शन क्षेत्रात 18.65 टक्क्यांची वाढ झाली असून वाहतूक महागाई शून्य टक्के वाढीवर स्थिर आहे.
हेही वाचा – Middle East Crisis : मध्य पूर्वेतील संकटामुळे प्लॅस्टिकची खेळणी महागली; कच्च्या तेलाच्या भडक्यामुळे दर इतक्या प्रमाणात वाढले
राज्यांमधील महागाईची स्थिती
देशातील विविध राज्यांचा विचार करता, तेलंगणा राज्यात महागाईचा दर सर्वाधिक 5.83 टक्के नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश (4.05 टक्के), कर्नाटक (3.96 टक्के), तामिळनाडू (3.77 टक्के) आणि राजस्थान (3.64 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. CPI इंडेक्स (Index) देखील गेल्या वर्षीच्या 101.39 वरून आता 104.84 वर पोहोचला आहे, जे किमतींमधील सातत्यपूर्ण वाढ दर्शवते.
भविष्यातील वाटचाल आणि संभाव्य धोके
येणाऱ्या काळात महागाईचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक शिपिंग आणि विमा खर्चावर होत आहे, ज्यामुळे आयात होणाऱ्या वस्तू महाग होऊ शकतात. खाण्यापिण्याच्या वस्तूंसोबतच इतर क्षेत्रांमधील किमतींवरही याचा परिणाम होईल. आगामी महिन्यांत सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार की ही दरवाढ कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.