Akshyay Khanna Exit from Drishyam 3 : बॉलीवूडचा प्रतिभावान अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या करिअरमधील सुवर्णकाळ अनुभवत आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटातील 'रहमान डकैत' या भूमिकेमुळे अक्षयची चाहत्यांमधली क्रेझ कमालीची वाढली असून त्याचा भावही वधारला आहे. मात्र, याच दरम्यान अक्षयने 'दृश्यम 3' मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय, या निर्णयामुळे चाहते अक्षवर नाराजही होण्याची शक्यता आहे. 'यश पचवता आलं नाही?' असा प्रश्नही चाहते अक्षयला विचारण्याची शक्यता आहे.
21 कोटींची मागणी आणि मानधनाचा तिढा
अक्षय खन्नाने 'दृश्यम 3' नाकारण्यामागे आर्थिक कारण असल्याचे प्रामुख्याने बोलले जात आहे. 'धुरंधर'च्या ऐतिहासिक यशानंतर अक्षयने आपले मानधन वाढवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी त्याने तब्बल 21 कोटी रुपयांची मागणी केली होती. निर्मात्यांच्या मते ही रक्कम त्यांच्या बजेटच्या बाहेर असल्याने दोन्ही बाजूंनी एकमत होऊ शकले नाही. 'दृश्यम 2' मध्ये आयजी तरुण अहलावत म्हणून अक्षयने अजय देवगणला दिलेली टक्कर प्रेक्षकांना खूप आवडली होती, मात्र आता पैशांच्या वादामुळे ही जोडी पुन्हा दिसणार नाही.
हेही वाचा – Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ची 600 कोटींची मजल; 20 व्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई
केसांच्या विगवरून झाले मतभेद?
केवळ मानधनच नाही, तर अक्षयच्या लूकवरूनही निर्मात्यांशी खटका उडाल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे. अक्षयला 'दृश्यम 3' मध्ये वेगळा लूक दाखवण्यासाठी 'विग' वापरायचा होता. मात्र, निर्मात्यांचा याला स्पष्ट विरोध होता. 'दृश्यम 2' मध्ये तो विगशिवाय दिसला होता, त्यामुळे कथेतील सातत्य राखण्यासाठी त्याचा जुनाच लूक कायम राहावा अशी निर्मात्यांची इच्छा होती. लूकच्या या तांत्रिक मुद्द्यावरून झालेल्या मतभेदांमुळे अक्षयने या प्रोजेक्टला सोडचिठ्ठी दिल्याचे समजते.
निर्मात्यांसमोर नवीन आव्हान आणि चाहत्यांची निराशा
अक्षय खन्नाच्या या निर्णयामुळे 'दृश्यम'च्या निर्मात्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अजय देवगणच्या 'विजय साळगावकर' या पात्राला तितक्याच ताकदीने भिडणारा दुसरा अभिनेता शोधणे आता निर्मात्यांसाठी कठीण काम असणार आहे. अक्षय आणि अजय या दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते आतुर होते, पण आता अक्षयच्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.