RBI Rule Mahatma Gandhi Series Notes Validity : देशात पुन्हा एकदा नोटाबंदी होणार का, अशी भीती निर्माण करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) एका जुन्याच आदेशाच्या फेर-परिपत्रकामुळे सध्या बँक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. मध्यवर्ती बँकेने 9 जून 2026 रोजी देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना उद्देशून एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, 2005 सालापूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील सर्व चलनी नोटा चलनातून बाद करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून 1 जुलै 2016 पासूनच सामान्य बँकांमधील त्यांची देवाणघेवाण बंद करण्यात आली आहे. आता या जुन्या नोटा स्वीकारण्याची किंवा बदलून देण्याची सुविधा केवळ रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल, असे यात पुन्हा सूचित करण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वीच्या नोटाबंदीच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या परिपत्रकामुळे बाजारात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे अंतर्गत पत्रक आणि सोशल मीडियावरील अफवा
आरबीआयच्या या आदेशाला अनुसरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाने 12 जून 2026 रोजी एक अंतर्गत परिपत्रक जारी केले. यामध्ये त्यांनी आपल्या सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालये आणि चलन पेढ्या म्हणजेच ‘करन्सी चेस्ट’ना 2005 पूर्वीच्या नोटांबाबत अत्यंत कडक नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया म्हणजेच समाजमाध्यमांवर एक बनावट संदेश वेगाने पसरला, ज्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली. या खोट्या संदेशात म्हटले होते की, '2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये केवळ 30 जून 2026 पर्यंतच स्वीकारल्या जातील.' हा संदेश पूर्णपणे तथ्यहीन आणि चुकीचा असल्याचे बँकेने शुक्रवारी त्वरित स्पष्ट केले असले, तरी अचानक अशी परिपत्रके काढण्याचे नेमके कारण काय, यावर बँकेच्या प्रवक्त्यांनी कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.
'महात्मा गांधी मालिका' आणि 'न्यू सीरिज' मधील फरक कसा ओळखायचा?
रिझर्व्ह बँकेने 1996 मध्ये पहिल्यांदा सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यास सुरुवात केली होती, ज्याला ‘महात्मा गांधी मालिका’ (एमजी सीरिज) असे नाव दिले गेले. सध्या ज्या नोटांवर बँकांनी कडक निर्बंध आणले आहेत, त्या 1996 ते 2005 या काळात छापलेल्या पहिल्या मालिकेतीलच आहेत. ग्राहकांना या नोटा ओळखणे सोपे जावे म्हणून आरबीआयने खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत:
– छपाईचे वर्ष: 2005 नंतर छापलेल्या सर्व नोटांच्या मागील बाजूच्या तळाशी छपाईचे वर्ष स्पष्टपणे छापलेले असते. 1996 ते 2005 दरम्यानच्या नोटांवर असे वर्ष नसते.
– महात्मा गांधी (न्यू) सिरीज: 2016 च्या नोटाबंदीनंतर केंद्र सरकार आणि आरबीआयने जी नवीन डिझाईन, रंग आणि आकारातील नोटांची मालिका आणली, तिला ‘महात्मा गांधी (न्यू) सिरीज’ म्हटले जाते, ज्या पूर्णपणे वैध आहेत.
आरबीआयच्या परिपत्रकातील महत्त्वाचे नियम आणि कायदेशीर दर्जा
आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्यासाठी आणि नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये अद्ययावत ठेवण्यासाठी या जुन्या नोटा चलनातून टप्प्याटप्प्याने बाद केल्या जात आहेत. या संदर्भात आरबीआयने बँकांसाठी खालील प्रमुख नियम जारी केले आहेत:
– वापरावर पूर्ण बंदी: बँकांनी कोणत्याही परिस्थितीत 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा ग्राहकांना एटीएमद्वारे किंवा बँकेच्या खिडकीवरून पुन्हा चलनात वापरासाठी देऊ नयेत.
– अद्यापही कायदेशीर चलन: सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, 8 नोव्हेंबर 2016 रोजी रद्द झालेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वगळता, इतर सर्व 2005 पूर्वीच्या जुन्या नोटांना (उदा. 10, 20, 50, 100) अजूनही कायदेशीर चलन (Legal Tender) म्हणून दर्जा आहे. म्हणजेच त्यांचे आर्थिक मूल्य संपलेले नाही.
– 10 वर्षांपूर्वीच बँकांच्या खिडकीवर स्वीकारणे बंद झालेल्या या जुन्या नोटांबाबत आता पुन्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक काढल्यामुळे आर्थिक वर्तुळात हे एक मोठे कोडे बनले आहे.