Raj Nidimoru Ex-wife Emotional Post : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांनी गुपचूप विवाह केल्यानंतर त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, आता राज निदिमोरू यांची पहिली पत्नी श्यामली डे यांनी एक मोठी आणि भावनिक पोस्ट (Shyamali De Emotional Post) लिहून सर्वांनाच धक्का दिला आहे. समंथा आणि राजच्या (Samantha-Raj Marriage) लग्नानंतर 3 दिवसांनी, म्हणजेच 4 डिसेंबर रोजी श्यामली यांनी सोशल मीडियावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
घटस्फोटानंतर राज यांनी श्यामली यांची फसवणूक केल्याची चर्चा
राज आणि श्यामली यांचा घटस्फोट (Raj-Shhyamali Divorce) 2022 मध्ये झाला असला तरी, राजने समंथासोबत पहिली पत्नी श्यामली यांची फसवणूक केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर, श्यामली डे यांची ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. श्यामली डे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मोठी नोट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच चाहत्यांचे आभार मानले, "तुमच्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी, चांगल्या शब्दांसाठी आणि आशीर्वादांसाठी मी तुमची आभारी आहे."
'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा घेतला आधार
श्यामली यांनी पुढे लिहिले, "मी एक रात्र तळमळत काढली, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहिले आणि स्वतःशीच विचार करत राहिले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्यापर्यंत येत असलेल्या या चांगुलपणाची कबुली न देणे, हे कृतघ्न आणि असभ्यपणाचे ठरेल." या कठीण काळात त्या 'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा (Twin Hearts Meditation) आधार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना क्षमा करणे सोपे जात आहे.
प्रेम आणि क्षमा करण्याची ऊर्जा
"मी अनेक वर्षांपासून 'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा सराव करत आहे," असे श्यामली यांनी नमूद केले. या मेडिटेशनमध्ये पृथ्वीमातेला (Mother Earth) आणि सर्व व्यक्तींना शांतता, प्रेम, क्षमा, आशा, प्रकाश, आनंद आणि शुभेच्छा देण्याचा समावेश असतो. "मी जी ऊर्जा इतरांना देत आहे, तीच आता माझ्याकडे परत येत आहे," असे सांगत या भावनिक आधाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
'ड्रामा' शोधणाऱ्यांना दूर राहण्याचे आवाहन
श्यामली यांनी आपली ही पोस्ट स्वच्छ ठेवण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे सोशल मीडिया सांभाळण्यासाठी कोणतीही पीआर टीम नाही. त्यांनी ड्रामा शोधणाऱ्यांना दूर राहण्याची विनंती केली. "माझी विनम्र विनंती आहे, कृपया ही जागा स्वच्छ ठेवा. धन्यवाद… तुम्हाला लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी, ब्रेकिंग न्यूज, एक्सक्लुझिव्ह मुलाखती, सहानुभूती किंवा ब्रँड प्रमोशन येथे मिळणार नाही," असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले. श्यामली डे यांनी या पोस्टमध्ये राज किंवा समंथाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी, सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट नवविवाहित जोडप्यासाठीच असल्याचा अंदाज लावला आहे.