SIA Action On Kashmir Times: जम्मूमध्ये गुरुवारी सकाळी राज्य तपास संस्था (SIA) ने मोठी कारवाई करत ‘काश्मीर टाइम्स’च्या कार्यालयावर छापा टाकला. तपास पथकाला येथे AK-47 रायफलच्या गोळ्या, एक पिस्तूल तसेच ग्रेनेड लीव्हर आढळून आला. या जप्तीमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. SIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापासून काश्मीर टाइम्सशी संबंधित व्यक्तींवर देशविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन दिल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुमारे सकाळी 6 वाजता तपास पथकाने कार्यालयात धाड घातली.
हेही वाचा – CBSE Exam: 2026 पासून CBSEची डबल बोर्ड परीक्षा प्रणाली लागू; नियमांमध्ये झाले हे बदल
वृत्तपत्राच्या व्यवस्थापनात बदल
काश्मीर टाइम्सची प्रिंट आवृत्ती काही वर्षांपासून बंद असून कामकाज प्रामुख्याने ऑनलाइन सुरू आहे. संस्थापक पत्रकार वेद भसीन यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगी अनुराधा भसीन आणि जावई प्रबोध जामवाल यांनी संचालन हाती घेतले होते. मात्र दोघेही गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. वेबसाइटवर सध्या प्रबोध हे मुख्य संपादक आणि अनुराधा या व्यवस्थापकीय संपादक म्हणून सूचीबद्ध आहेत.
हेही वाचा – Nitish Kumar: मोदी – शाहंच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
काही दिवसांपूर्वीच वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर
या कारवाईपूर्वीच वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. देशविरोधी मजकूर प्रकाशित केल्याचा आरोपही पूर्वी एकदा या वृत्तपत्रावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे तपास अधिक तीव्र झाल्याचे समजते. जप्त शस्त्रसाठा आणि कार्यालयातील साहित्याचा सध्या SIA कडून बारकाईने तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.