PUC Certificate New Rules : देशातील करोडो वाहनधारकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्याचे प्रस्तावित केले आहे. केंद्रीय मोटार वाहन (सुधारणा) नियम, 2026 च्या मसुद्यानुसार (Draft Notification) आता गाड्यांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेमध्ये मोठे बदल केले जात आहेत. नवीन नियमांनुसार BS-VI (BS-6) मानांकाच्या खासगी वाहनांना आता थेट 3 वर्षांपर्यंतची वैधता मिळू शकते. 22 जुलै 2026 रोजी स्वाक्षरी झालेला आणि 24 जुलै 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या प्रस्तावावर केंद्र सरकारने पुढील 30 दिवसांच्या आत नागरिक आणि भागधारकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
वाहनांच्या श्रेणीनुसार PUC ची नवीन वैधता रचना
सुधारित प्रस्तावानुसार वाहनाचे मानांकन आणि त्याचा प्रकार (खासगी की व्यावसायिक) यावर पीयूसी प्रमाणपत्राची वैधता खालीलप्रमाणे ठरणार आहे:
– BS-VI खासगी वाहने: पहिल्या नोंदणीपासून सुरुवातीच्या 6 वर्षांपर्यंत 3 वर्षांची वैधता; 6 ते 10 वर्षांपर्यंतच्या वाहनांसाठी 1 वर्षाची वैधता आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी 6 महिन्यांची वैधता असेल.
– BS-VI व्यावसायिक (Commercial) वाहने: सुरुवातीच्या 6 वर्षांपर्यंत 2 वर्षांची वैधता; 6 ते 10 वर्षांपर्यंत 1 वर्षाची वैधता आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी 6 महिन्यांची वैधता राहील.
– इतर मानांकांची वाहने: BS-IV (BS-4) मानांकाच्या सर्व वाहनांसाठी 6 महिन्यांची वैधता असेल, तर BS-I, BS-II आणि BS-III या जुन्या वाहनांसाठी ही मुदत 3 महिन्यांची असेल.
नवीकरणाबाबत स्पष्टता आणि नवीन नियम
प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाबाबत (Renewal) स्पष्ट नियम मसुद्यात देण्यात आले आहेत. जर कोणत्याही वाहनधारकाने चालू पीयूसी प्रमाणपत्र संपण्याच्या मुदतीपूर्वी 15 दिवस आधीच नवीन प्रमाणपत्र काढले, तर ते जुन्या मुदतीची तारीख संपल्यापासूनच प्रभावी मानले जाईल. तर इतर सर्व सामान्य प्रकरणांमध्ये, नवीन प्रमाणपत्र हे ते जारी झाल्याच्या किंवा नूतनीकरण केलेल्या तारखेपासून लागू केले जाईल.
30 दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन
केंद्र सरकारच्या या मसुद्यावर कोणत्याही नागरिकाला किंवा संस्थेला आपले मत किंवा आक्षेप नोंदवायचे असल्यास, ते comments-morth@gov.in या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवू शकतात. राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचा विचार करून केंद्र शासन अंतिम अधिसूचना जारी करेल आणि नवीन PUC नियम देशभरात लागू केले जातील.
हेही वाचा – Instagram Ban in India: 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं