Delhi Protest: भारताच्या शेजारील देश बांगलादेशातील ढाका येथे एका हिंदू तरुणाला संपवण्यात आलं. या घटनेचे पडसाद आता भारताच्या राजधानीत उमटले आहेत. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर आज संतप्त आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न आणि हनुमान चालीसा पठण
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि विविध हिंदू संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज सकाळी बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला. ‘बांगलादेश सरकार हाय-हाय’ आणि कट्टरतावाद्यांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी लावलेले सुरक्षा बॅरिकेड्स आंदोलकांनी हटवण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढून हनुमान चालीसा पठण करताना दिसले, ज्यामुळे आंदोलनाचे स्वरूप अधिक आक्रमक झाले.
सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
आंदोलनाचा वाढता जोर पाहता दिल्ली पोलिसांनी उच्चायुक्तालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निमलष्करी दलाच्या तुकड्याही पाचारण करण्यात आल्या असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट तटबंदी केली होती, मात्र आंदोलक सातत्याने बॅरिकेड्स ओलांडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते.
बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
ढाका येथील घटनेबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांगलादेशात हिंदू समाज सुरक्षित नाही आणि तेथील सरकार कट्टरपंथी शक्तींना रोखण्यात अपयशी ठरत आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलकांनी बांगलादेशी प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
नेमकी घटना काय?
ढाका येथे एका हिंदू तरुणाला कट्टरवाद्यांनी संपवलं होतं. या घटनेचे व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.