PM YASASVI Scholarship: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'पीएम यशस्वी शिष्यवृत्ती' (PM YASASVI Scholarship) योजना राबवली जात आहे. इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील भारतीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अकरावीपर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही योजना आखण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना 31ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रतेचे प्रमुख निकष आणि आवश्यक कागदपत्रे
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या (National Scholarship Portal) अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. योजनेसाठी खालील पात्रता व कागदपत्रे आवश्यक आहेत:
– उत्पन्न मर्यादा: विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
– पात्र प्रवर्ग: केवळ OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील भारतीय विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
– कागदपत्रे: जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, गुणपत्रक (Marksheet), शाळेचे प्रवेश प्रमाणपत्र, ओळख पुरावा (Identity Proof) आणि बँक पासबुकची प्रत (PDF किंवा JPEG स्वरूपात).
हेही वाचा – Anuja Hawale: बीडच्या अनुजाची कमाल! राज्यात दुसरी येत थेट इस्रोच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड
ऑनलाईन अर्ज करण्याची टप्प्याटप्प्याने पद्धत
विद्यार्थ्यांनी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम 'New Registration' करणे आवश्यक आहे. त्यानंतर मिळालेला Application ID आणि Password वापरून 'Fresh Login (AY 2026-27)' अंतर्गत आपला अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व बँक खात्याचा सर्व तपशील अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. एकदा 'Final Submit' केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येत नसल्याने माहिती नीट तपासून घ्यावी. अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढून संबंधित शाळेतील 'Institute Nodal Officer' यांच्याकडून ऑनलाईन पडताळणी (Verification) करून घेणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि इतर मार्गदर्शक सूचना
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत असली, तरी शाळास्तरावरील अर्जांची पडताळणी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत चालणार आहे. यानंतर जिल्हा व राज्यस्तरावरील अंतिम पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो. इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी याबाबत पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.