Odisha Plane Crash: ओडिशामध्ये शनिवारी दुपारी एक मोठा विमान अपघात टळला. भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या 'इंडियावन एअर'च्या नऊ आसनी सेसना ग्रँड C208B विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाने दुपारी 12:25 वाजता भुवनेश्वरहून उड्डाण केले होते, मात्र राउरकेला विमानतळावर उतरण्यापूर्वीच दुपारी 1:14 च्या सुमारास वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) संकटाचा इशारा देणारा 'मेडे' (Mayday) कॉल केला. धावपट्टीपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात येताच पायलटने मोकळ्या मैदानात विमान उतरवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मोकळ्या मैदानात धाडसी लँडिंग
राउरकेला विमानतळापासून सुमारे 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालदा-कानसोर परिसरातील एका मोकळ्या मैदानात दुपारी 1:20 वाजता हे विमान उतरवण्यात आले. लँडिंग दरम्यान विमानाचे नुकसान झाले असून त्यात सहा जण जखमी झाले आहेत. विमानात एकूण चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार आहेत. इंडियावन एअर ही कंपनी 2022 पासून ओडिशा सरकारच्या पाठबळाने प्रादेशिक विमान सेवा चालवत आहे. राज्य सरकारने या घटनेची माहिती केंद्र सरकारला दिली असून, तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचे पथक घटनास्थळाला भेट देणार आहे. या यशस्वी इमर्जन्सी लँडिंगमुळे विमानातील सहा जणांचे प्राण वाचल्याने वैमानिकाचे कौतुक होत आहे.